लातूर : निलंगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस व भाजपाकडून एकमेकांवर गुंडगिरी व दहशतीचे आरोप केले जात आहेत. मात्र मतदारसंघातील लोक नेमकी गुंडगिरी कोणाची याबद्दल चांगलेच संभ्रमात असून त्याची रसभरीत चर्चा गावोगावी सुरू आहे. निलंगा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने यावेळी निलंगेकर घराण्या व्यतिरिक्त अभय साळुंके यांना उमेदवारी दिली आहे. अभय साळुंके हे मनसे, शिवसेना व काँग्रेस असा प्रवास केलेले कार्यकर्ते आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेनेत असताना त्यांनी लातूरचे माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांना देशातील सुप्रसिद्ध अशा राजर्षी शाहू महाविद्यालयात शेकडो विद्यार्थ्यांसमोर पट्ट्याने मारहाण केली होती व त्याची चित्रफित तयार करून समाज माध्यमात प्रसारित केलेली होती. त्यांच्यावर ३०७ कलमाखाली गुन्हा नोंद असून अजूनही तो न्यायालयात प्रलंबित आहे ,असे असताना अभय साळुंके व आमदार अमित देशमुख निलंग्यातील संभाजी पाटील निलंगेकर यांची गुंडगिरी व दहशत संपवण्याचे आवाहन नागरिकांना करत असून त्यासाठी आम्ही तरुण तडफदार अभय साळुंके यांना उमेदवारी दिली असल्याचे सांगत आहेत.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचा प्रचार दौराच नाही

अभय साळुंके हे संभाजी पाटील यांनी निलंग्यातील रस्ते महामार्गावर दीडशे जणांच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे .संभाजी पाटील निलंगेकर यांनी या मतदारसंघात गुंड कोण आहे हे गावोगावच्या लोकांना माहिती आहे त्यामुळे गुंडगिरी व दहशत कोण करते व ती निपटून काढण्यासाठी लोक तयार आहेत ,लोकांना त्याबद्दल वेगळे सांगावे लागत नाही अशी टिप्पणी केली आहे.

आणखी वाचा-अजित पवारांचे दरोडा शिवसैनिकांना नकोसे

अभय साळुंके यांची प्रतिमा ही जनतेत योग्य नाही सातत्याने बघून घेऊ, मारु, झोडपू याच भाषेत ते बोलत असतात.ते निवडणुकीत उभे आहेत याचे भान विसरून बऱ्याच वेळा अशी विधाने करतात त्यामुळे नागरिकात त्यांच्याबद्दल समज पक्का झाला आहे. देशमुखांना निलंगेकरावर शेलक्या भाषेत टीका करणारा शिलेदार हवा होता तो या निवडणुकीच्या निमित्ताने रिंगणात उतरवला आहे.देशमुखांच्या विरोधात लातूरात अर्चना पाटील चाकूरकर उभे रहाण्यात संभाजी पाटील निलंगेकर यांची भूमिका महत्त्वाची ठरल्याने देशमुखांनी निलंगा मतदारसंघाला लक्ष्य केले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 congress and bjp are accusing each other of hooliganism and terror in nilanga assembly constituency print politics news mrj