गोंदिया : जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, अर्जुनी मोरगाव आणि आमगाव देवरी या चारही मतदारसंघांत बंडखोरीला उधाण आले आहे. महाविकास आघाडीतील बंडखोरीची झळ काँग्रेसला सर्वाधिक बसली आहे. बंड शमवण्यासाठी काँग्रेसकडून स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरू आहे, मात्र काँग्रेस ‘हायकमांड’ने अद्याप या बंडखोरीची दखल घेतली नसल्याचे चित्र जिल्ह्यात बघावयास मिळत आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आणि स्थानिक नेते बंडखोरांची समजूत घालण्यात यश येईल, असे सांगत आहेत.
गोंदिया विधानसभेत माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. येथे शिवसेना (उबाठा) चे जिल्हाध्यक्ष पंकज यादव यांनी महाविकास आघाडीतर्फे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे. याशिवाय, काँग्रेसचे राजीव ठकरेले यांनीही रिंगणात उडी घेतली आहे. यादव यांना वरिष्ठांकडून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे आदेश आले आहेत. त्यांनी शिवसेना कार्यालयात मला बोलावले आणि आपल्या कार्यकर्त्यांसमोर पाठिंबा दर्शवला, असे अग्रवाल यांनी सांगितले. काँग्रेसचे बंडखोर ठकरेले यांच्याशी अद्याप बोलणे झाले नाही, आम्ही आपल्या परीने यासाठी प्रयत्नशील आहोत. गरज पडली तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची यासंदर्भात मदत घेऊ, असेही अग्रवाल यांनी स्पष्ट केले. मात्र, ठकरेले यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.
हेही वाचा >>> बंडखोरांना थोपविण्यासाठी चर्चा, भेटींचे सत्र; वणी, उमरखेड, यवतमाळमध्ये बंडखोर माघार घेण्याची शक्यता नाही
तिरोडा विधानसभेची जागा महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली आहे. रविकांत (गुड्डू) बोपचे यांना येथून दुसऱ्यांदा संधी देण्यात आल्यामुळे जिल्हा परिषद सदस्य जितेंद्र कटरे, माजी सभापती पी.जी. कटरे, राधेलाल पटले, अर्चना ठाकरे या काँग्रेस नेत्यांनी बंडखोरी केली आहे. शुक्रवारी या चौघांची काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत चर्चा होणार आहे. या चारपैकी एकाला रिंगणात कायम ठेवले जाणार आहे. यामुळे उमेदवार रविकांत बोपचे यांची डोकेदुखी वाढली असून ते आणि त्यांचे वडील माजी खासदार डॉ. खुशाल बोपचे बंडखोरांच्या मनधरणीसाठी प्रयत्नरत आहेत.
हेही वाचा >>> बंडखोरांची मनधरणी! अपक्ष कुणाला घाम फोडणार?
अर्जुनी मोरगाव मतदारसंघात महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे दिलीप बनसोड उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेस नेते अजय लांजेवार यांनी बंडखोरी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत आपला उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, असा पवित्रा लांजेवार यांनी घेतला आहे. अनुसूचित जमातीकरिता राखीव असलेल्या आमगाव देवरी मतदारसंघात विद्यमान आमदार सहेसराम कोरेटी यांना उमेदवारी नाकारून काँग्रेसने त्यांच्या जागी राजकुमार पुराम यांना उमेदवारी दिली. यामुळे नाराज झालेल्या कोरेटी यांनी बंडाचा झेंडा उंचावला. मात्र, ते आपला अर्ज परत गेणार असल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात आहे.