चंद्रपूर: अनुसूचित जातीसाठी राखीव चंद्रपूर मतदारसंघातून काँग्रेसने बौद्ध समाजाचे प्रवीण पडवेकर यांना उमेदवारी दिली, तर भाजपने याच समाजातून येणाऱ्या ब्रिजभूषण पाझारे यांना उमेदवारी नाकारली. यावरून, सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेसने न्याय दिला, तर भाजपने अन्याय केला, अशी चर्चा चंद्रपूर मतदारसंघात सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे, असे भाजप नेते तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार नेहमीच सांगतात. मात्र, या निवडणुकीत भाजपने गरीब बौद्ध समाजातील ब्रिजभूषण पाझारे या सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली नाही. मागील ३० वर्षांपासून पाझारे भाजपमध्ये सक्रिय आहेत. पंचायत समिती सदस्यापासून सभापती, जिल्हा परिषद सदस्य व सभापती असा राजकीय प्रवास पाझारे यांचा आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पाझारे यांनी भाजपकडून उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न केले होते. मात्र पक्षाने त्यावेळी विद्यमान आमदार नाना शामकुळे यांच्यावर विश्वास दाखविला. शामकुळेंना नाराजीचा फटका बसला आणि अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार निवडून आले. आता २०२४ मध्ये पुन्हा पाझारे यांनी उमेदवारी मिळावी, यासाठी अगदी सुरुवातीपासून प्रयत्न केले. मुनगंटीवारदेखील त्यांच्याबद्दल सकारात्मक होते. मात्र, माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी दिल्लीत वरिष्ठ पातळीवर चक्रे फिरवली व अपक्ष आमदार जोरगेवार यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला. उमेदवारीही त्यांनाच मिळाली. परिणामी, भाजपने पाझारेंसारख्या सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय केल्याची भावना मतदारसंघात निर्माण झाली आहे.  जिल्ह्यात भाजपकडून इतर पक्षांतून आलेल्यांनाच पदे दिली जातात, निष्ठावान कार्यकर्ते केवळ सतरंज्याच उचलतात, अशी चर्चा सुरू आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Assembly Election 2024: स्वपक्षीय व मित्रपक्षाचे बंडखोर, बेदखल ठरणार काय बंडखोरी ?

दुसरीकडे, काँग्रेसने प्रवीण पडवेकर या अतिसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली. पडवेकर यांचे नाव २००९ मध्येच चर्चेत आले होते. मात्र, त्यावेळी माजी नगराध्यक्ष बिता रामटेके यांना उमेदवारी दिली गेली. त्यानंतर काँग्रेसने सलग दोन वर्षे महेश मेंढे यांना उमेदवारी दिली. यंदाही काँग्रेसकडून अनेकजण इच्छुक होते, अनेकांची नावेही चर्चेत होती. मात्र काँग्रेसचे जेष्ठ नेते विनायक बांगडे व विजय वडेट्टीवार यांनी पडवेकर यांच्यासाठी आग्रह धरला. खासदार मुकुल वासनिक यांनी देखील दिल्लीत काँग्रेसच्या बैठकीत नाव उचलून धरले. काँग्रेसनेही याची दखल घेत पडवेकर यांना उमेदवारी दिली. काँग्रेसने एका सामान्य कार्यकर्त्याला न्याय दिला, तर भाजपने प्रस्थापितासाठी पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय केला, अशी चर्चा मतदारसंघात जोर धरू लागली आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 congress name pravin padvekar for chandrapur assembly constituency elections print politics news zws