पीटीआय, नवी दिल्ली
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या बहुमतासह विजयाचा विश्वास व्यक्त करत कोणतीही वेळ न दवडता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा एका दिवसात जाहीर करणार असल्याचे काँग्रेस सरचिटणीस सचिन पायलट यांनी शुक्रवारी ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवताना कोणतीही अडचण येणार नसल्याचेही ते म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने सचिन पायलट यांना मराठवाडा विभागाची जबाबदारी दिली होती. पायलट यांनी महाराष्ट्रासह झारखंड आणि पोटनिवडणुका होत असलेल्या मतदारसंघांत अनेक ठिकाणी प्रचार सभा घेतल्या. मतदानोत्तर चाचण्यांतून दोन्ही राज्यांमध्ये भाजप युतीला बहुमत मिळेल, असे दाखवण्यात येत असले तरी पायलट यांनी या चाचण्यांचे निकाल फेटाळून लावले आहेत. महाराष्ट्र, झारखंड आणि पोटनिवडणुकांतील निवडणूक निकाल भाजप आणि त्यांच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला खरी परिस्थिती दाखवून देईल, असे ते म्हणाले.
हेही वाचा : मतमोजणीसाठी यंत्रणा सज्ज; मुंबईत १० ठिकाणी केंद्रे; सुरुवातीला टपाल मतांची मोजणी
हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक असले तरी महाराष्ट्र आणि झारखंडमधील स्थिती वेगळी आहे. महाराष्ट्रात भाजपप्रणीत ‘डबल इंजिन’ सरकारने नागरिकांच्या अपेक्षांची पूर्ती केली नाही. येथील मतदारांना बदल अपेक्षित होता. तो शनिवारच्या निकालात दिसून येईल, असे ते म्हणाले.
हेही वाचा : नांदेडमध्ये ‘विक्रमादित्य’ कोण, उत्कंठा शिगेला!
‘भाजपकडे विश्वासार्ह चेहराच नाही’
झारखंडमध्ये विद्यामान मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकण्यात आले. परंतु सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांना दिलासा मिळाला. केंद्रीय तपास यंत्रणांचा हा गैरवापर राज्यातील मतदारांच्या पसंतीस पडलेला नाही. झारखंडमध्ये भाजपकडे विश्वासार्ह चेहराही नाही. त्यामुळे झारखंडसह महाराष्ट्रातही ‘इंडिया’ आघाडी सरकार स्थापन करण्याच्या चांगल्या स्थितीत आहेत, असे सचिन पायलट यांनी ‘पीटीआय’ला सांगितले. सचिन पायलट यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महाराष्ट्रात दोन डझनाहून अधिक सभा घेतल्या.