चंद्रपूर : २०१९ ची विधानसभा आणि नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा भरघोस मतदान झाले. मतदानाची वाढीव टक्केवारी, दलित, मुस्लीम समाजाचे भरघोस मतदान, तसेच शहरी मतदारांमधील उदासिनता व ग्रामीण भागातील उत्साह कोणाच्या पथ्यावर पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांची टक्केवारी वाढली खरी, मात्र लाडकी बहीण योजनेचा हा परिणाम नसल्याचे सांगितले जात आहे.
जिल्ह्यातील राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, ब्रम्हपुरी, चिमूर व वरोरा या सहा मतदारसंघांत ७१.३३ टक्के मतदान झाले. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत ६७.५७ टक्के मतदान झाले होते, तर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ६४.८३ इतकी होती. या दोन्ही निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी वाढली आहे. दलित, मुस्लीम समाजातील मतदारांनी आणि झोपडपट्टीबहुल परिसरातील मतदारांनी भरघोस मतदान केले.
हेही वाचा – मतदानाचे मुद्दे : विदर्भ; लाडकी बहीण अन् सोयाबीनचा भाव!
चिमूर व ब्रम्हपुरी या दोन मतदारसंघांत अनुक्रमे ८१.७५ टक्के व ८०.५४ टक्के मतदान झाले आहे. २०१९ मध्ये चिमूरमध्ये ७५.१, तर ब्रम्हपुरीत ७१.५३ टक्के मतदान झाले होते. बल्लारपूर व वरोरा या दोन मतदारसंघांत अनुक्रमे ६९.७ व ६९.४८ टक्के मतदान झाले. येथे २०१९ मध्ये ६२.५३ आणि ६२.७८ टक्के मतदान झाले होते. या दोन्ही मतदारसंघांत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. राजुरामध्ये ७२.७१ टक्के मतदान झाले. या एकमेव मतदारसंघात मतदानाचा टक्का केवळ १ ने वाढला आहे. चंद्रपूर या शहरी मतदारसंघात मतदारांमध्ये कमालीची उदासिनता बघायला मिळाली. येथे ५७.५८ टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये या मतदारसंघात केवळ ५१.४२ टक्के मतदान झाले होते.
हेही वाचा – मतदानाचे मुद्दे : मराठवाडा; मुद्दे हेच, प्राधान्यक्रम वेगवेगळे!
बल्लारपूरचे भाजप उमेदवार विद्यमान वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विकासाच्या मुद्यावर मते मागितली. याशिवाय इतर कोणत्याही उमेदवाराने विकासकामांचा मुद्दा मांडला नाही. अन्य मतदारसंघात जातीचा मुद्दा प्रभावीपणे दिसून आला. त्यासोबतच लाडकी बहीण योजनेचा प्रचार भाजप व काँग्रेस या दोन्ही उमेदवारांनी केला. एकंदरीत जिल्ह्यातील सहाही मतदारसंघांत मतदानाचा टक्का वाढला असून तो कोणासाठी लाभदायी ठरणार, याबाबत विविध तर्क लावले जात आहे.