मुंबई : मतदान यंत्रातील बिघाड, संथ मतदान प्रक्रिया आणि मतदान केंद्राबाहेर लागलेल्या रांगामुळे लोकसभा निवडणुकीत शहरी भागातील मतदारांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर तीव्र नापसंती व्यक्त केली होती. त्यानंतर शहरी भागातील मतदान केंद्राचे विकेंद्रीकरण तसेच एकावेळी चार मतदारांना मतदान केंद्रात प्रवेश देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राज्यात सोमवारी विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीतील गोंधळाची पुनरावृत्ती टळली. विशेष म्हणजे यावेळी मतदान यंत्रे बंद पडण्याच्या किरकोळ तक्रारी वगळता राज्यात सर्वत्र शांततेत आणि उत्साहात मतदान पार पडल्यामुळे आयोगाने सुटकेचा नि:श्वास सोडला.
लोकसभा निवडणुकीत मुंबई, ठाण्यात मतदानाच्या दिवशी प्रचंड गोंधळ झाला होता. मतदान केंद्रांवर भल्यामोठ्या रांगा लागल्या होत्या. एकावेळी एकाच मतदाराला मतदान केंद्रात सोडण्याच्या आयोगाच्या निर्णयामुळे मतदानासाठी मतदारांना बराच वेळ ताटकळत राहावे लागले होते. उन्हाळ्यात मतदान असताना पंखे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली नव्हती. तसेच अनेक ठिकाणी वारंवार विद्याुत पुरवठा खंडीत होणे, मतदान यंत्रातील बिघाड यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर टीका केली होती. त्याचवेळी मुंबईतील मतदारांनीही आयोगाच्या नियोजनशून्य कारभारावर जोरदार टीका केली होती.
हेही वाचा : विदर्भात हिंसक घटना, रोकडही जप्त; सायंकाळी ६ पर्यंत सरासरी ५८ टक्के मतदानाची नोंद
मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरी भागातील मतदानाच्या घटलेल्या टक्केवारीवरून जनता आणि राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडेच बोट दाखविले होते. त्याची दखल घेत विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयोगाने यावेळी अनेक निर्णय आणि उपाययोजना केल्या होत्या. बुधवारच्या मतदानादरम्यान या निर्णयांचे सकारात्मक परिणाम दिसून आले, तसेच लोकसभेच्या तुलनेत मतदानाच्या टक्केवारीतही काहीप्रमाणात सुधारणा झाल्याची माहिती आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.