मुंबई : राज्याच्या सत्तास्थापनेत मुंबईचा कौल नेहमीच निर्णायक ठरतो. मुंबईत यश मिळणारा पक्ष किंवा आघाडीचा राज्याच्या सत्तेचा मार्ग मोकळा होतो. यंदा मुंबईत अत्यंत चुरशीच्या लढती होत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचीही भिस्त मुंबईवर आहे. मुंबईत भाजप आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी मुंबईची निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
मुंबईत विधानसभेचे ३६ मतदारसंघ आहेत. राज्याच्या सत्तास्थापनेत मुंबईतील आमदारांचे संख्याबळ महत्त्वाचे ठरते. १९७८ पासून निकालाच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास मुंबईत सर्वाधिक जागा मिळणारा पक्ष किंवा आघाडी-युती राज्याच्या सत्तेत आले आहेत. १९७८ मध्ये जनता पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आले होते. तेव्हाच पुलोदचा प्रयोग करण्यात आला होता. १९८० व १९८५ मध्ये काँग्रेसला मुंबईत निर्विवाद यश मिळाले होते. १९९० मध्ये मुंबईत प्रथमच शिवसेना-भाजप युतीने काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढले. १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीला सत्ता मिळाली तेव्हा मुंबईत युतीला एकतर्फी यश मिळाले होते. १९९९ मध्ये राज्यात सत्तांतर झाले तरी मुंबईत शिवसेना-भाजपचे वर्चस्व होते. २००४ आणि २००९ मध्ये राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सत्ता मिळाली तेव्हा मुंबईने काँग्रेसच्या बाजूने कौल दिला होता. २०१४ मध्ये स्वबळावर लढताना मुंबईत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या आणि भाजपला राज्याची सत्ता मिळाली होती. गेल्या वेळी भाजप आणि शिवसेना युतीने मुंबई एकहाती जिंकली होती. अर्थात, भाजप आणि शिवसेनेचे मार्ग नंतर वेगळे झाले होते.
शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईची राजकीय समीकरणे बदलली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला एकनाथ शिंदे यांनी आव्हान दिले. शिवसेनेचे आमदार, माजी नगरसेवक, शाखाप्रमुख शिंदे यांच्याबरोबर गेले. अनेक माजी नगरसेवक शिंदे यांच्या गळाला लागले. आपलीच शिवसेना खरी हे सिद्ध करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूने झाला. लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहापैकी शिवसेना ठाकरे गटाचे तीन तर शिंदे गटाचा एक खासदार निवडून आला. शिंदे गटाचे वायकर हे अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले. महायुतीचे सरकार सत्तेत आल्यावर झालेल्या अंधेरी पूर्व मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपने माघार घेतली होती. यामुळे गेल्या अडीच वर्षांत शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईतील लोकसभा, विधानसभा पोटनिवडणूक वा विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये शिवसेना ठाकरे गटाने यश मिळविले आहे. मुंबई आणि ठाकरेंची शिवसेना हे समीकरण कायम राखण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
मुंबईत भाजप व शिवसेना ठाकरे गटात चुरस बघायला मिळते. काँग्रेसलाही मुंबईत चांगल्या यशाची अपेक्षा आहे. महायुतीचा विचार केल्यास मुंबईत भाजपची ताकद अधिक आहे. शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांची हक्काची तेवढी मतपेढी नाही. शिंदे गटाची सारी मदार ही ठाकरे गटापासून दुरावणाऱ्या मतांवर आहे. ठाकरे गटाची किती मते फोडण्यात शिंदे यशस्वी होतात यावर सारे अवलंबून आहे. शिवसेना ठाकरे गटाला भाजप, शिंदे गट आणि मनसे अशा विविध आघाड्यांवर सामना करावा लागत आहे. मुंबईत मनसेने ताकद लावली आहे. मनसे शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या मतांमध्ये किती भागीदार होते, यावर सारी समीकरणे अवलंबून आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपची पारंपरिक मते शिवसेनेच्या शिंदे गटाकडे हस्तांतरित झाली होती, पण शिंदे यांची मते भाजपकडे गेली नाहीत. ही मते ठाकरे गटाकडे हस्तांतरित झाली होती. यामुळेच यंदा भाजप, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) यांच्यात परस्परांमध्ये मते हस्तांतरित करण्याचे मोठे आव्हान असेल.
हे ही वाचा… महायुतीसमोर कुणाचं आव्हान? मनसेचा उल्लेख करत विनोद तावडेंनी केले मोठे विधान
धारावीचा मुद्दा केंद्रस्थानी
मुंबईचे नागरी प्रश्न, वाहतूक, रेल्वे, मेट्रो हे सारे मुद्दे प्रचारात दुय्यम ठरले. मुंबईचा प्रचार हा धारावीचा पुनर्विकास आणि अदानी यांच्याभोवताली केंद्रित राहिला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी धारावीवरून रण माजविले. यावर भाजप आणि शिवसेना शिंदे गटाचा प्रतिवाद करण्यात वेळ गेला.
लोकसभेचा कल कायम की…?
मुंबईत मराठीबरोबरच हिंदी, गुजराती, उत्तर भारतीय भाषकांप्रमाणेच मुस्लिमांची मतेही काही मतदारसंघांमध्ये लक्षणीय आहेत. याशिवाय दलित मतदारही मोठ्या प्रमाणावर आहेत. लोकसभा निवडणुकीत मुंबईतील सहापैकी चार जागा महाविकास आघाडी तर दोन जागा महायुतीला मिळाल्या होत्या. तेव्हा दलित-मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणावर झाले होते. लोकसभा निवडणुकीत मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघांपैकी १९ मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी तर १७ मतदारसंघांमध्ये महायुतीला आघाडी मिळाली होती. लोकसभेचा मतांचा कल कायम राहतो की मतांचे समीकरण बदलते यावरही मुंबईचा निकाल अवलंबून असेल.
ठाकरे शिंदे ११ ठिकाणी समोरासमोर
मागाठाणे, विक्रोळी, भांडुप, जोगेश्वरी, दिंडोशी, अंधेरी पूर्व, चेंबूर, कुर्ला, माहीम, वरळी, भायखळा या ११ मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे ठाकरे आणि शिंदे गटाचे उमेदवार परस्परांच्या विरोधात लढत आहेत. महायुतीत शिंदे गट दुय्यम भूमिकेत आहे. महाविकास आघाडीत शिवसेना ठाकरे गट मुंबईत २१ जागा लढवीत आहे.
१९७८ – जनता पक्ष
१९८० – काँग्रेस
१९८५ – काँग्रेस
१९९० – शिवसेना-भाजप युती
१९९५ – शिवसेना-भाजप युती (संपूर्ण यश)
१९९९ – शिवसेना-भाजप
२००४ – काँग्रेस
२००९ – काँग्रेस
२०१४ – भाजप
२०१९ – भाजप-शिवसेना युती
भाजप – १६,
शिवसेना – १४,
काँग्रेस – ४,
राष्ट्रवादी – १,
समाजवादी पार्टी – १