नागपूर : विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व प्रकारचे उपाय करूनही यंदा सर्वच पक्षांत बंडखोरी झाली. काहींवर त्यांच्या पक्षाने कारवाई सुद्धा केली. मात्र, बंडखोरी करून निवडणूक रिंगणात उतरलेल्या नागपूर जिल्ह्यातील अनेक दिग्गजांनी यापूर्वी निवडणुकीत यश मिळवल्याचा इतिहास आहे. यात अनेक माजी मंत्री आणि आमदारांचा समावेश आहे. तर अनेकांच्या राजकीय जीवनाची सुरुवातच अपक्ष उमेदवार म्हणून झाली आहे. यात माजी गृहमंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री सुनील केदार, माजी मंत्री रमेश बंग, विद्यमान आमदार ॲड. आशीष जयस्वाल आदींचा समावेश आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराने सध्या जोर पकडला आहे. यंदाही शहरासह ग्रामीणमध्ये अनेक जागांवर बंडखोरी झाली आहे. बंडखोरीमध्ये काँग्रेस अग्रेसर आहे हे विशेष. अपक्ष म्हणून रिंगणात असलेल्या बंडखोरांचा राजकीय इतिहास पाहिला असता शहरामध्ये त्यांना फारसे यश आलेले दिसत नाही. परंतु, ग्रामीण भागात मात्र यापूर्वी अनेक बंडखोरांनी स्वपक्षाच्या विरोधात निवडणूक लढवून विजयश्री खेचून आणली आहे.

हेही वाचा : भाजपमधील दुखावलेले कार्यकर्ते आपल्याकडे वळवण्याचे धनंजय मुंडेंसमोर आव्हान

१९९५ च्या निवडणुकीत काटोल मतदारसंघातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुनील शिंदे यांच्या विरोधात अनिल देशमुख यांनी बंडखोरी केली होती व प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा २९ हजार ८०९ मते घेत विजय मिळवला होता. पहिल्यांदाच अपक्ष म्हणून निवडून आल्यावर ते सेना-भाजप मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाले होते. याच निवडणुकीत सावनेर मतदारसंघात बंडखोर उमेदवार सुनील केदार यांनी काँग्रेस नेते व सावनेरचे सलग दोनवेळा प्रतिनिधित्व करणारे रणजित देशमुख यांचा पराभव केला होता. केदार यांना ६० हजार ३२५ मते मिळाली होती. १९९५ मध्येच रामटेकमधून अपक्ष अशोक गुजर यांनी काँग्रेस उमेदवार आनंदराव देशमुख यांच्या विरुद्ध बंड केले होते. गुजर हे ५२ हजार ४२८ मते घेत निवडून आले होते. कामठीतून देवराव रडके यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार यादवराव भोयर यांच्या विरुद्ध बंड करीत ५९ हजार मते घेत विजय मिळवला होता. पूर्वीचा कळमेश्वर व आताच्या हिंगणा मतदारसंघातून १९९५ मध्येच रमेश बंग यांनी ३५ हजार मते घेत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार नाना गावंडे यांचा पराभव केला होता.

अलीकडच्या काळातील बंडखोरीचे उदाहरण द्यायचे ठरल्यास ते २०१९ मधील रामटेक विधानसभा मतदारसंघातील देता येईल. या मतदारसंघात विद्यमान आमदार आशीष जयस्वाल यांनी मित्रपक्ष भाजपचे उमेदवार मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या विरुद्ध बंड करीत निवडणूक लढवली व जिंकलीही. आता जयस्वाल शिवसेनेकडून तर रेड्डी त्यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवत आहेत. यावर्षी शहरातील पूर्व नागपूर, मध्य नागपूर तर ग्रामीणमध्ये रामटेक आणि काटोल मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. त्यामुळे बंडखोरांच्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का? हे २३ नोव्हेंबरला मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

हेही वाचा : ऐरोलीतील बंडोबांना शिंदे सेनेचे अभय ?

२००४ मध्ये काँग्रेस चौथ्या स्थानी

सुनील केदार २००४ मध्ये पुन्हा अपक्ष उमेदवार म्हणून लढले. त्यांनी ६१ हजार ८६३ मते घेतली होती. या निवडणुकीत भाजपचे देवराव आसोले दुसऱ्या तर बसप तिसऱ्या स्थानावर होती. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार चंदनसिंह रोटेले हे चौथ्या क्रमांकावर होते. त्यानंतर केदार पुन्हा काँग्रेसमध्ये आले. त्यानंतर ते काँग्रेसकडून सातत्याने विजयी होत आहेत. यंदा ते निवडणूक रिंगणात नाहीत.

हेही वाचा : भाजपाचे नेते काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे चीअरलीडर्स आहेत; केटी रामाराव यांचा आरोप!

शहरात अपक्ष यशापासून दूरूच

१९९० मध्ये उत्तर नागपूरमधून अपक्ष उमेदवार भाऊराव लोखंडे यांनी १४ हजार २०५ मते घेतली होती. यावेळी या मतदारसंघातून रिपाइं खोब्रागडे गटाचे उपेंद्र शेंडे ३३ हजार ६०३ मतांनी निवडून आले होते. २००९ मध्ये मध्य नागपूरमध्ये रवींद्र दुरुगकर यांनी ९ हजार १५७ मते घेतली होती. याच वर्षी दक्षिण नागपूरमधून मोहन मते यांनी तेव्हा १६ हजार १८ मते घेतली होती, परंतु यशापासून दूर होते. यावेळी दीनानाथ पडोळे निवडून आले होते. २०१४ मध्ये मोदी लाट असतानाही दक्षिण नागपूरमधून अपक्ष उमेदवार शेखर सावरबांधे यांनी १५ हजार १०७ मते घेतली असली तरी यश मिळवता आले नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 former ministers who rebel and won assembly elections anil deshmukh sunil kedar print politics news css