छत्रपती संभाजीनगर : बीडमधील गेवराई विधानसभा मतदारसंघात काका-पुतणे आणि मेहुणे, अशा नात्यांमधील तीन प्रमुख उमेदवारांमध्ये खरी लढत होत असून, प्रतिस्पर्ध्यांच्या मतांची वजाबाकी अधिक कोण करेल त्यावर विजयाचे गणित ठरणार आहे. गेवराई हा मतदारसंघ जालना जिल्ह्याच्या सीमेवर असून, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचे मातोरी हे गाव पूर्वी गेवराई तालुक्यातच होते आणि त्यांचे आंतरवली सराटी हे आंदोलनस्थळही नजीक आहे. तर ओबीसींसाठी आंदोलन करणारे प्रा. लक्ष्मण हाके यांचे वडिगोद्री आंदोलनस्थळही जवळच आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गेवराईत महायुतीचे विजयसिंह पंडित, महाविकास आघाडीचे बदामराव पंडित व मतदारसंघाचे दहा वर्ष प्रतिनिधीत्व केलेले विद्यमान आमदार आणि भाजपला सोडचिठ्ठी देऊन अपक्ष उमेदवारी दाखल करणारे लक्ष्मण पवार यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे. हे तिन्ही उमेदवार परस्परांचे जवळचे नातेवाईक आहेत. विजयसिंह पंडित आणि बदामराव पंडित हे काका-पुतणे आहेत. तर विजयसिंह पंडित यांचे बंधू जयसिंह पंडित यांना आमदार लक्ष्मण पवार यांची सख्खी बहीण दिलेली आहे. तिन्ही उमेदवार राजकीय पार्श्वभूमी राहिलेल्या घराण्यातील आहेत.

आणखी वाचा-निलंग्यात गुंडगिरी, दहशतीवरून आरोप प्रत्यारोप

बदामराव पंडित हे स्वत: राज्यमंत्री होते व ते शिवसेनेचे (ठाकरे) उमेदवार आहेत. विजयसिंह पंडित यांचे ज्येष्ठ बंधू अमरसिंह पंडित हे यापूर्वी विधान परिषद सदस्य राहिलेले असून त्यांचे वडील शिवाजीराव पंडित हे राज्यमंत्री होते.. शिवाजीराव पंडित घराण्याची ओळख शरद पवारांचे निकटवर्तीयच म्हणून आहे. परंतु अलिकडच्या काळातील राष्ट्रवादीच्या फुटीत अमरसिंह पंडित यांनी अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या पक्षाकडूनच विजयसिंह पंडित हे उमेदवार आहेत.

गेवराई विधानसभा मतदारसंघाने लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला ३९ हजारांवर मताधिक्य दिले होते. विधानसभेसाठी ३ लाख ७२ हजारांपर्यंतचे मतदान आहे. मतदारसंघाजवळच मनोज जरांगे पाटील यांचे गाव आहे. त्यांचे आंदोलनस्थळही जवळच असल्याने येथे मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक तापलेला असतो. परंतु गेवराई मतदारसंघात ओबीसींचीही मते अधिक असून, जालन्यातील वडिगोद्री हा भाग आणखी जवळ आहे. वडिगोद्रीतच प्रा. लक्ष्मण हाके यांचेही आंदोलन पेटलेले होते. या परिसरात धनगर व वंजारी, बंजारा, पारधी समुदायातील मतेही एखाद्याच्या विजयात महत्त्वाची ठरणारी आहेत. वंजारी समाजातील मयूरी खेडकर आणि प्रियंका खेडकर या दोन महिला व शरद पवारांच्या पक्षात काम केलेल्या पूजा मोरे या स्वराज्य पक्षाकडून उमेदवारही आहेत.

आणखी वाचा-ठाणे जिल्ह्यात आदित्य ठाकरेंचा प्रचार दौराच नाही

मतदारसंघात पाच प्रमुख मराठा उमेदवार आहेत. जरांगे यांच्या आरक्षण आंदोलनात बस जाळण्याच्या व पिस्तुल सापडल्याच्या आरोपावरून चर्चेत आलेले ऋषिकेश बेदरे हेही अपक्ष उमेदवार आहेत. बेदरे व पूजा मोरे हे दोन्ही मराठा उमेदवार आहेत. पंडित काका-पुतणे, मेहुणे लक्ष्मण पवार या तीन नात्यांतील मराठा उमेदवारांमध्ये अधिक मराठा मतदानासोबतच ओबीसी, दलित, मुस्लिम समुदायाचे व बंजारा, पारधी व इतर घटकातील मतदान कोण कोणाचे अधिक वजा करेल, यावर विजयाचे गणित बांधले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 gevrai assembly constituency beed real fight between three major candidates from uncle nephew and brother in law relations print politics news mrj