गोंदिया जिल्ह्यातील तीन मतदारसंघांत थेट तर एका मतदारसंघात चौरंगी लढत रंगली आहे. गोंदिया मतदारसंघात महाविकास आघाडीचे गोपालदास अग्रवाल (काँग्रेस) विरुद्ध महायुतीचे विनोद अग्रवाल (भाजप) या दोघांतच थेट लढत आहे. दोन्ही उमेदवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आमगाव-देवरी मतदारसंघात महायुतीचे संजय पुराम विरुद्ध महाविकास आघाडीचे राजकुमार पुराम या दोघात मुख्य लढत असली तरी भाजपचे बंडखोर आदिवासी नेते शंकर मडावी यांच्यामुळे त्यात चुरस निर्माण झाली आहे.

हेही वाचा >>>महायुतीसमोर कुणाचं आव्हान? मनसेचा उल्लेख करत विनोद तावडेंनी केले मोठे विधान

तिरोडा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत होत आहे. येथे भाजपकडून माजी आमदार विजय रहांगडाले रिंगणात आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रविकांत बोपचे यांनी दंड थोपटले आहे.

अर्जुनी मोरगाव येथील लढतीकडे जिल्ह्यातील लक्षवेधी लढत म्हणून पाहिले जात आहे. येथे भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) घड्याळ हातावर बांधून रिंगणात उतरले आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसचे माजी आमदार दिलीप बनसोड यांचे आव्हान आहे. या दोन्ही प्रमुख उमेदवारांसमोर बंडखोर उमेदवारांनी कडवे आव्हान निर्माण केले आहे. विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे पुत्र सुगत चंद्रिकापुरे यांनी प्रहार संघटनेकडून उमेदवारी मिळवत या लढतीला तिहेरी, तर काँग्रेसकडून इच्छुक असलेले अजय लांजेवार यांनी चौरंगी केली आहे.

हेही वाचा >>>Eknath Khadse Political Retirement : एकनाथ खडसे यांचे राजकारणातून निवृत्त होण्याचे संकेत

दिग्गज नेत्यांनी प्रचार मैदान गाजवले

गोंदिया जिल्ह्यात महाविकास आघाडीकडून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, कन्हैया कुमार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, रोहित पवार यांनी, तर महायुतीकडून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चित्रा वाघ, नरोत्तम मिश्रा, केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चव्हाण, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, या दिग्गज नेत्यांनी प्रचार मैदान गाजवले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 gondia district direct contest in three constituencies while four way contest in one constituency print politics news amy