मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीत युती व आघाडी यांनी एकत्र निवडणूक लढवूनही छोट्या पक्षांनी मोठ्या संख्येने उमेदवार मैदानात उतरवले. त्यामुळे उमेदवार संख्येने चार हजारांचा आकडा पार केला आहे. धनगर, मुस्लीम आणि दलित उमेदवारांची संख्या यावेळी वाढली असून नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीप्रमाणे राज्यातही मतविभागणीचा फटका मोठ्या पक्षांना बसण्याचा अंदाज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्राच्या सहा विधानसभा निवडणुकीतली उमेदवार संख्या पाहता १९९९ मध्ये २००६, २००४ च्या निवडणुकीत २६७८, २००९ च्या निवडणुकीवेळी ३५५९ आणि २०१९ मध्ये ३२३७ उमेदवार होते. २०१४ च्या निवडणुकीत युती व आघाडी यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्याने सर्वाधिक ४४०७ उमेदवार होते. या निवडणुकीत महायुती महाविकास आघाडी संयुक्तपणे निवडणुका लढवत असूनही उमेदवारांची संख्या ४१३६ आहे.

हेही वाचा :हाणामारीबरोबर मतदान यंत्रे फोडली, मराठवाड्यात ६२ टक्क्यांहून अधिक मतदानाचा अंदाज

महादेव जानकर यांचा राष्ट्रीय समाज पक्ष ९३, अॅड. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी २००, राजू शेट्टी-बच्चू कडू यांची परिवर्तन महाशक्ती १०६, सुरेश माने- प्रकाश शेंडगे यांची आरक्षणवादी आघाडी १०३ आदी छोट्या पक्षांचे उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत १४ आंबेडकरी पक्ष मैदानात असून या पक्षांचे ४३७ उमेदवार रिंगणात आहेत. त्याबरोबरच ४२० मुस्लीम उमेदवारही रिंगणात आहेत. त्यामध्ये नोंदणीकृत पक्षाचे १५० आणि अपक्ष मुस्लीम २१८ उमेदवार आहेत.

काँग्रेसला असा फटका…

●नुकताच पार पडलेल्या हरियाणा विधानसभा निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी मोठ्या संख्येने मते घेतली होती. जाट आणि बिगर जाट मतांमध्ये विभागणी करण्यात भाजपला यश आले होते. परिणामी, त्याचा फटका काँग्रेसला बसला.

हेही वाचा :संभाजीनगरच्या ग्रामीणभागात उत्साह; सिल्लोड, वैजापूर येथे तणाव

●भाजपचे हे सूत्र ‘हरियाणा प्रारूप’ म्हणून ओळखले जात आहे. राज्यात या निवडणुकीत दलित, धनगर आणि मुस्लीम उमेदवारांची संख्यावाढ आश्चर्यजनक आहे.

●सहा महिन्यापूर्वी राज्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीपेक्षा भाजपप्रणित महायुतीला दीड टक्का कमी मते होती. विधानसभेला ४१३६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे अपक्ष व छोट्या पक्षांचे उमेदवार मतविभागणी करण्यात कळीचे ठरणार आहेत.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 haryana pattern vote division maharashtra print politics news css