कागल

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या कागल विधानसभा मतदारसंघातील संग्राम पुन्हा पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि समरजित घाटगे या गेल्या वेळच्या तुल्यबळ उमेदवारांत होत आहे. फरक आहे तो दोघांचेही पक्ष बदलल्याचा. हसन मुश्रीफ राष्ट्रवादीत असले तरी पूर्वी ते ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या मर्जीतले म्हणून ओळखले जात असत. आता त्यांनी अजित पवार यांचे घड्याळ हाती बांधले आहे. भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळलेले घाटगे यांनी महायुतीचे उमेदवार मुश्रीफ असणार हे ओळखून तुतारी वाजवायला सुरुवात केली आहे.

गेल्या वेळी मुश्रीफ- अपक्ष उमेदवार घाटगे यांच्यात लढत होत असताना तिसरे उमेदवार होते शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे. या घाटगे यांच्या गूळ पावडर कारखाना उभारणीला त्यांचे महाविद्यालय मित्र असलेले मुश्रीफ यांनी मदत केली. त्याची उतराई म्हणून आता संजय घाटगे यांनी मुश्रीफ यांना निवडणुकीत पाठबळ दिले आहे.

यामुळे मुश्रीफ यांच्या भाषेत त्यांना दहा हत्तीचे बळ मिळाले आहे. लोकसभा निवडणुकीला शिवसेनेचे संजय मंडलिक पराभूत झाल्याने त्यांचे पुत्र रोहित यांनी बंडाचा झेंडा घेण्याचा इशारा प्रसिद्धीपुरता राहिला. आता मंडलिक पितापुत्र मुश्रीफ यांच्या प्रचारात असले तरी घाटगे यांच्या सभांमध्ये मंडलिक यांच्या पराभवाचा वचपा विधानसभेला काढला जाणार अशी विधाने ऐकायला मिळतात.

हेही वाचा >>> Sharad Pawar : अजित पवारांचा शिंदेंना दम? शरद पवारांकडून भर सभेत मिमिक्री; म्हणाले, “शिंदेंनी मला विनंती केली, समजून घ्या…”

महाविकास आघाडी आणि नंतर महायुती या दोन्ही सत्ता काळात मंत्रीपदी राहिल्याने मुश्रीफ यांनी मोठ्या प्रमाणात विकासनिधी खेचून आणला आहे. या विकासकामांचाच डंका ते मतदारांसमोर दणकून वाजवत आहेत. याआधारे लाखाच्या मताधिक्याने विजयी होऊन उपमुख्यमंत्रीपद मिळेल, अशी खात्री ते व्यक्त करीत आहेत. नेहमीच्या पद्धतीने प्रचाराला जे आवश्यक ती यंत्रणा त्यांनी जोमाने उभी केली आहे.

निर्णायक मुद्दे

●राष्ट्रवादीचे (शरद पवार) समरजित घाटगे यांनी उभे केलेले आव्हान तितकेच प्रबळ आहे. त्यांचा तरुणाईवर प्रभाव दिसतो. मुश्रीफ यांच्या विकासकामांतील दोषांची ठळकपणे मांडणी ते करत असतात. त्यातून नव्या काळाशी नवे सुसंगत उच्चशिक्षित नेतृत्व कसे असावे याचा तपशील चार्टर्ड अकाउंटंट असलेले घाटगे मांडत असतात.

●मुश्रीफ सर्वाधिक चर्चेत आले ते ईडीने केलेल्या कारवाईमुळे. तेव्हा त्यांची देहबोली कशी राहिली यावर घाटगे यांनी टीकेचे प्रहार चालवले आहेत. त्यातून ते मुश्रीफ हे धडाडीचे नव्हे तर पलायनवादी असल्याचा मुद्दा पटवून देत आहेत. त्याला प्रत्युत्तर म्हणून मुश्रीफ हे घाटगे यांच्या बंद पडलेल्या संस्थांचा पंचनामा करताना दिसतात.

लोकसभेतील राजकीय चित्र

महायुती १,२७,८८१

महाविकास आघाडी १,१४,०२३

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 hasan mushrif vs samarjit ghatge kagal assembly constituency print politics news zws