बुलढाणा : विदर्भाचे प्रवेशद्वार असलेल्या मलकापूर मतदारसंघात यंदा मागच्या लढतीतील प्रतिस्पर्धीच मैदानात आहेत. यंदाही महायुतीचे उमेदवार माजी आमदार चैनसुख संचेती (भाजप) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजेश एकडे (काँग्रेस) यांच्यातच लढत होत आहे. मात्र, छुपी बंडखोरी आणि मतांचे विभाजन हा यंदा कळीचा मुद्दा असून ते ज्याच्या पथ्यावर पडेल तो विजयाचा मानकरी ठरेल, असे सध्याचे चित्र आहे.
२०१९ च्या लढतीत एकडे यांनी संचेती यांचा पराभव केला होता. नवीन चेहरा, सर्वाधिक संख्या असलेल्या बहुजन समाजाचे पाठबळ, एकसंघ आघाडी आणि विरोधी पक्षातील एका गोटातून मिळालेले छुपे पाठबळ, याचा लाभ एकडेंना झाला. मात्र आता नळगंगेच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. पाच वर्षे आमदार राहिल्याने आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या मुद्यावर फारसे यशस्वी न ठरल्याने त्यांच्या विरोधात ‘अँटीइन्कम्बन्सी’ हा महत्त्वाचा घटक आहे. मागील लढतीत थेट मुकुल वासनिकांच्या शिफारसीवरून आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या संमतीने त्यांची उमेदवारी पक्की झाली होती. मात्र यावेळी मलकापूर नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष हरीश रावळ, रमेश खाचने, हाजी रशीदखान जमादार (मलकापूर), पद्मराव गावंडे (पाटील), गजानन बावस्कर या पाच जणांनी उमेदवारीवर दावा केला. यातील रावळ यांनी बंडाचा झेंडा फडकवत अर्जही दाखल केला. मात्र, वासनिकांच्या निर्देशानंतर त्यांनी माघार घेतली. ते अजूनही ‘नॉट रिचेबल’ आहेत. इतर इच्छुकांचीही नाराजी कायम आहे. ही बाब एकडे यांच्यासाठी धोक्याची घंटा समजली जात आहे. त्यामुळे त्यांचा बराच वेळ नाराजी काढण्यात गेला.
उघड बंडखोरीचा धोका दूर झाल्याने लढत दुरंगी असली तरी एकडे यांच्यासाठी ती सोपी नाही. मागील पाच वर्षांत केलेली विकासकामे, काँग्रेसची पारंपरिक मते, संपर्क समाजाची मते यावर त्यांची भिस्त आहे. त्यांना राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाची साथ आहे. मात्र या दोन्ही पक्षांचे संघटन येथे मर्यादित आहे. सात अल्पसंख्याक उमेदवारांमुळे होणारे मतविभाजन, कुणबी विरुद्ध पाटील हा सामाजिक संघर्ष याचाही सामना त्यांना करावा लागणार आहे.
हे ही वाचा… आर्थिकदृष्ट्या मागास भंडारा जिल्ह्याचे आमदार कोट्यधीश…
हे ही वाचा… रिकाम्या गावात प्रचार कोणापुढे करायचा? गावकरी शेतात, उमेदवार पेचात
संचेतींसाठी अस्तित्वाची लढाई
भाजप प्रदेश उपाध्यक्ष संचेती यांच्यासाठी ही राजकीय अस्तित्वाची लढाई ठरली आहे. १९९५ पासून २०१४ पर्यंत सलग आमदार असणारे संचेती यांना मागील लढतीत पराभवाचा फटका बसला. हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला. यात जवळच्या काही लोकांनी केलेला घात म्हणजे त्यांच्यासाठी भळभळती जखम ठरली. यंदाही अशाच नेत्यांनी त्यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी पक्षांतर्गत ‘लॉबिंग’ केले. मतदारसंघात भाकर फिरवण्याचा विचार पुढे आला. मात्र, दिल्लीपर्यंत गेलेला उमेदवारीचा तिढा सोडवत त्यांनी तिकीट खेचून आणले. मात्र, त्यांच्यासाठीही ही लढत सोपी नाही. या लढतीतील विजय त्यांच्या स्वपक्षासह इतर पक्षातील विरोधकांना चपराक देणारा ठरणार आहे. पराभूत झाले तर त्यांचे राजकारण धोक्यात येईल हे नक्की! त्यामुळे त्यांनी यंदा अधिक दक्षता घेत आणि मागील चुकांची पुनरावृत्ती टाळून प्रचाराला सुरुवात केली आहे.
© The Indian Express (P) Ltd