अकोला : अकोला, वाशीम जिल्ह्यातील पक्ष, आघाड्यांमधील उदंड बंडामुळे मतविभाजनाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पक्षांच्या अधिकृत उमेदवारांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. बंड शमविण्याची धडपड पक्ष नेतृत्वासह उमेदवार करीत आहेत. मात्र, प्रभावी नेते माघार घेण्याची शक्यता नगण्यच दिसून येते. काही बंडखोर प्रभावहीन असल्याने त्यांची बंडखोरी बेदखल असल्याचे चित्र देखील आहे. बंडामुळे राजकीय समीकरण बदलण्याचा अंदाज आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रत्येक मतदारसंघात इच्छुकांची मोठी गर्दी होती. महायुती व मविआ असल्यामुळे मर्यादित इच्छुकांना संधी मिळाली. अनेकांनी बंडाचा झेंडा हातात घेतला. अकोला पश्चिम मतदारसंघात सर्वाधिक बंडखोरी झाली. भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ. अशोक ओळंबे प्रहार जनशक्ती पक्षाकडून निवडणूक लढत आहेत. ते अधिकृत पक्षाकडून निवडणूक लढत असल्याने आता माघार घेण्याची शक्यता दिसत नाही. भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष हरीश अलिमचंदानी यांनी अपक्ष म्हणून दंड थोपाटले. त्यांची पक्ष नेतृत्वाकडून समजूत काढली जात आहे. यशस्वी व्यापारी व सिंधी समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. ते निवडणूक रिंगणात कायम राहिल्यास भाजपच्या परंपरागत मतपेढीत विभागणी होऊ शकते. त्यामुळे बंड शमविण्याची पक्षाकडून प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेसचे डॉ. झिशान हुसेन वंचितच्या तिकिटावर निवडणूक रिंगणात उतरल्याने ते माघारी फिरण्याची शक्यता नाही. अपक्ष म्हणून रिंगणातील काँग्रेसचे माजी महापौर मदन भरगड, शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा, प्रकाश डवले यांची समजूत काढली जात आहे. बाळापूरमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी बंड करून अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. ते प्रहार पक्षात गेले असले तरी त्यांनी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरणे टाळले. काही अपक्ष माघार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे ही वाचा… भाजप, शरद पवारांचे उमेदवार मराठवाड्यात सर्वत्र; काँग्रेस, अजित पवारांची पाटी काही जिल्ह्यांमध्ये कोरी

वाशीम जिल्ह्याच्या रिसाेड मतदारसंघातील बंडाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या अमित झनक यांना जोरदार लढत देणारे माजी मंत्री अनंतराव देशमुख पुन्हा एकदा अपक्ष म्हणून मैदानात आहेत. भाजपकडून रिसोडमध्ये उमेदवारी मिळेल, या आशेवर त्यांनी पुत्रांसह पक्ष प्रवेश केला होता. मात्र, त्यांचा भ्रमनिरास झाला. हा मतदारसंघ शिवसेनेसाठी सुटल्याने येथून भावना गवळी उमेदवार आहेत. अपक्ष अनंतराव देशमुखांची उमेदवारी कायम राहिल्यास महायुतीला मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे मनधरणी केली जात आहे. त्यात कितपत यश येते, यावर मतदारसंघातील राजकीय गणित ठरतील. कारंजा मतदारसंघात सर्वाधिक अपक्ष उमेदवार आहेत. महायुती व मविआतील अनेक घटक पक्षांतील इच्छुकांनी अर्ज दाखल केले. मतविभाजन टाळण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे. कारंजा मतदारसंघात चौरंगी लढत होण्याची चिन्हे आहेत. वाशीम मतदारसंघात भाजपने आमदार लखन मलिक यांचा पत्ता कट करून श्याम खोडे यांना उमेदवारी दिली. भाजपतील अनेक इच्छूक अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. त्यातील अनेक जण माघार घेऊ शकतात. ४ नोव्हेंबरनंतरच मतदारसंघातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे.

हे ही वाचा… Maharashtra Assembly Election 2024 : हायकमांड’कडून बंडखोरीची दखल नाहीच, गोंदिया जिल्ह्यातील चित्र

बंडखोरांचा सावध पवित्रा

प्रबळ महत्त्वकांक्षा ठेऊन इच्छुकांनी तिकीटासाठी प्रयत्न केले. उमेदवारी न मिळाल्यांनी वंचित किंवा प्रहार पक्षांकडून निवडणूक लढण्याचा मार्ग काहींनी स्वीकारला. पक्षाचा अधिकृत उमेदवार राहिल्यास माघार घेता येणार नाही. त्यामुळे अनेकांनी इतर पक्षात प्रवेश करून देखील अपक्ष उमेदवारी दाखल केली. अपक्ष उमेदवारी घेऊन माघारी फिरण्याचा मार्ग त्यांनी खुला ठेवला. अनेक बंडखोरांनी हा सावध पवित्रा घेतला आहे. योग्य आश्वासन व मनधरणीची देखील काही बंडखोरांची अपेक्षा असल्याचे बोलल्या जाते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 in akola and washim district bjp struggling to quell rebellion print politics news asj