नागपूर : पुरुषांपेक्षा अधिक प्रमाणात महिलांचे मतदान झालेल्या पश्चिम नागपूर मतदारसंघात कोणाच्या बाजूने कौल मिळते हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पण, भाजप आणि काँग्रेस वाढलेल्या मताचा लाभ आपल्यालाच होणार असल्याचा दावा करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात ५५.७८ टक्के मतदान झाले आहे. मागील निवडणुकीत ५०.४ टक्के मतदान झाले होते. मताचा टक्का मागील निवडणुकीच्या तुलनेत ५ टक्क्यांहून अधिक वाढला आहे. स्थानिक मुद्यांव्यतिरिक्त येथे आरक्षण, संविधान आणि काही प्रमाणात हिंदुत्वाच्या मुद्यांभोवती ही निवडणूक चालल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्यानुसार सत्ताविरोधी भावना प्रबळ झाल्यास मतदानाचा टक्का वाढतो. लोकांना सत्ताबदल हवा असल्याने तो मदानाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बाहेर पडतो. तर भाजपच्या दाव्यानुसार लाडकी बहीण योजना बंद पडू नये म्हणून महिलांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले आहे.

हेही वाचा – दरात चढ उतार; सोयाबीन हमीभावापेक्षा कमीच…

मतदानाची टक्केवारी वाढण्यास अनेक घटक कारणीभूत असल्याचे दिसून येते. यामध्ये काँग्रेस, भाजप तसेच अपक्ष उमेदवाराकडून झालेला आक्रमक प्रचार हा एक आहे. त्याचा परिणाम मतदाराच्या टक्केवारीवरून दिसून आले आहे. शिवाय मुस्लीम समाजाच्या काही संघटनांनी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला होता. परिणामी मुस्लीम महिलांनी मोठ्या संख्येने मतदान केले. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मतदानाच्या दोन दिवसआधी नागपुरात ‘रोड-शो’ घेतला होता. यावेळी मुस्लीम महिला मोठ्या प्रमाणात रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असल्याचे चित्र होते. अनुसूचित जातीचे २० ते २१ टक्के मतदार आहेत. हा समाज निवडणुकीबाबत सर्वांत जागृत समजला जातो. लोकसभा निवडणुकीत मतांचे विभाजन होऊ नये म्हणून तो काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला होता. यावेळी देखील अशीच स्थिती असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील विविध संघटनांनी घरोघरी जाऊन मतदान करण्याचे आवाहन केल्याने मतांचा टक्का वाढल्याचे भाजपचे पदाधिकारी सांगत आहेत. दोन्ही प्रमुख पक्षांकडून दावेप्रतिदावे केले जात असल्याने वाढलेल्या मतांचा कोणाला फायदा आणि कोणाला तोटा होईल, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – नागपूर : काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळकेसह समर्थकांवर गुन्हे, अधिकाऱ्यांच्या वाहनाची तोडफोड…

पुरुषांपेक्षा ४८४ अधिक महिलांचे मतदान

पश्चिम नागपूरमध्ये एकूण ३ लाख ८८ हजार ३५३ मतदार आहेत. पुरुष मतदार १ लाख ९२ हजार ७५ आणि महिला १ लाख ९६ हजार २४७ मतदार आहेत. पुरुषांपेक्षा महिला मतदारांचे अधिक मतदान झाले आहे. १ लाख ८ हजार ६६ पुरुषांनी आणि १ लाख ८ हजार ५४९ महिलांनी मतदान केले. महिला मतदारांची वाढलेली टक्केवारीवर काँग्रेस आणि भाजप दावा करत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 in west nagpur womens voting more then men it will benefit whom print politics news ssb