कर्जत

अलिबाग : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बंडात साथ देणारे कर्जत-खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यापुढे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने केलेली बंडखोरी मुळावर आली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची बंडखोरीला फूस असल्याचा आरोप थोरवे यांनीच केल्याने महायुतीत कटुता वाढली आहे.

कर्जत-खालापूर मतदारसंघातून शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) महेंद्र थोरवे पुन्हा निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्यासमोर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नितीन सावंत यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे बंडखोर सुधाकर घारे यांचे आव्हान आहे. घारे यांच्या बंडखोरीमुळे महायुतीच्या मतविभाजनाचा फायदा महाविकास आघाडीला होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या मतदारसंघाला पक्षांतर्गत बंडखोरीची परंपरा लाभली आहे. जवळपास प्रत्येक विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात बंडखोरी होते. याचा फटका प्रस्थापित उमेदवारांना बसतो. महायुतीकडून हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळावा यासाठी सुनील तटकरे आग्रही होते, मात्र जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाला गेला. त्यामुळे नाराज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली सामूहिक राजीनामे दिले. यानंतर घारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. घारे यांच्या बंडखोरीला सुनील तटकरे जबाबदार असल्याचा गंभीर आरोप थोरवे यांनी केला आहे. त्यामुळे सत्ताधारी दोन्ही पक्षांतील वाद विकोपाला गेले आहेत.

हेही वाचा:लक्षवेधी लढत: मुख्यमंत्र्यांना दिघेंच्या कुटुंबातून आव्हान

दुसरीकडे थोरवे यांच्यावर भाजपही नाराज आहे. याच नाराजीमुळे भाजपचे विधानसभा संघटक किरण ठाकरे यांनी मतदारसंघातून बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र रवींद्र चव्हाण यांच्या मनधरणीनंतर त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. पण थोरवे यांचे काम करण्यास त्यांनी नकार दिल्याने थोरवेंच्या अडचणी वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुतीला अपेक्षित मताधिक्य मिळाले नव्हते. त्यामुळे श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने सहकार्य केले नसल्याचा आरोप केला होता. त्यांचा रोख कर्जत-खालापूर मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांकडे होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने कर्जतमध्ये शिवसेनाविरोधात राष्ट्रवादी वादाचा दुसरा अंक सुरू झाला आहे.

हेही वाचा:लक्षवेधी लढत: जातीय ध्रुवीकरणामुळे भुजबळांसमोर कडवे आव्हान

निर्णायक मुद्दे

● मतदारसंघात पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि भरघोस निधी आणण्यात आलेले यश ही थोरवे यांच्यासाठी जमेची बाजू आहे. मात्र त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील या बंडखोरीमुळे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांच्या अडचणी वाढणार आहेत. महायुतीच्या मतविभाजनाचा फटका त्यांना बसू शकतो. याशिवाय भाजप पदाधिकाऱ्यांची नाराजी भोवू शकते.

लोकसभेतील राजकीय चित्र

● महायुती – ७५,५३४ ● महाविकास आघाडी – ९३,१९४

Story img Loader