अलिबाग : कोकणातल्या निवडणुका या आजवर पक्षनिष्ठा आणि संघटन यावर लढल्या गेल्या. त्यामुळे कोकणात कमी खर्चात निवडणुका पार पडतात, असा आजवरचा इतिहास होता. यंदा मात्र, कोकणातील उमेदवारांनी पैशाचा पाऊस पाडून मतदारांना भुलवण्याची एकही संधी सोडली नाही. त्याचा प्रभाव मतदानात दिसून आला. त्याच वेळी घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजप आणि महायुतीमध्येच एकेका कुटुंबातील दोन-दोन उमेदवार रिंगणात असल्याचा मुद्दाही केंद्रस्थानी राहिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : काँग्रेसकडून आमदारांसाठी विशेष विमान, दगाफटका होऊ नये म्हणून आधीच खबरदारी

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. मतदारांची पक्षावर असलेली निष्ठा अढळ होती. त्यामुळे मुंबईतून उमेदवार दिला तरी तो सहज कोकणातून निवडून दिला जायचा. मात्र कोकणवासीयांसाठी ही निवडणूक प्रतिमेला उभा छेद देणारी ठरली. निवडणुकीत निष्ठा आणि संघटनेपेक्षा घराणेशाही आणि पैसा हे घटक वरचढ ठरले. रायगडमधील पनवेलपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी मतदारसंघापर्यंत याचीच प्रचीती आली. मुंबई जवळ असल्याने रायगड जिल्ह्यातील शहरी भागात मतदारांना प्रलोभने दाखवण्याचा प्रकार काही प्रमाणात अस्तित्वात होता. मात्र दक्षिण रायगड, रत्नागिरी आणि सिधुदूर्ग जिल्ह्यात असे प्रकार होत नसत. यावेळी मात्र मतदारांना आपल्या उमेदवाराकडे खेचण्यासाठी पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात आर्थिक रसद पुरवली गेली. कोकणातील गावागावांतील लोक मुंबईत आणि सुरतमध्ये कामा निमित्ताने स्थायिक आहेत. हे सर्व कोकणातील मतदार आहेत. या मतदारांना आणण्यासाठी यंदा उमेदवारांनी जोरदार प्रयत्न केल्याचे पहायला मिळाले.घराणेशाहीचा वारसा तिन्ही जिल्ह्यात पहायला मिळाला, रायगड जिल्ह्यात सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे, रत्नागिरी जिल्ह्यात उदय आणि किरण सामंत हे बंधु, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नितेश आणि निलेश राणे बंधु निवडणूक रिंगणात होते. त्यामुळे राणे, सामंत आणि तटकरे घराणी निवडणुकीच्या केंद्रस्थानी असल्याचे पहायला मिळाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 konkan voting issues cash crop caste issue of nepotism print politics news css