lingayat vote in latur assembly constituency लातूर जिल्ह्यात लिंगायत मतपेढीही प्रभावशील मानली जाते. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात लिंगायत समुदाय मोठ्या संख्येत असून, त्यांची मतपेढी यावेळी कोणाच्या बाजूने राहील, यावर जिल्ह्यात आतापासूनच चर्चेचे फड रंगू लागले आहेत. त्यात यावेळी लिंगायत समाजाचा कल बदलण्याच्या शक्यतेचाच सूर अधिक असून, मतपेढी कोणाच्या बाजूने कलते याविषयीचे आडाखे बांधले जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेस पक्षाने यावेळी लिंगायत उमेदवार विधानसभेत दिलेला नाही. तर महायुतीत भाजपला सुटलेल्या लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून लिंगायत समाजातील डाॅ. अर्चना पाटील चाकूरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. डाॅ. अर्चना पाटील या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्नुषा आहेत.

हेही वाचा >>> Malegaon Assembly Constituency : मालेगावात उमेदवारच नसल्याने महायुतीची निवडणुकीपूर्वी हार

लातूर शहर विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची मते ही ५० ते ६० हजारांच्या संख्येने मानली जातात. तर दुसऱ्या क्रमांकावर औसा विधानसभा मतदारसंघ येतो. या मतदारसंघात साधारणपणे २७ टक्के मराठा व २२ टक्के लिंगायत समाजाची मते आहेत. त्यानंतर निलंगा व उदगीर मतदारसंघामध्ये साधारणत: १२ ते १५ टक्क्यांवर लिंगायत समाज येतो. तर अहमदपूर व लातूर ग्रामीण मतदारसंघामध्ये ५ ते १० टक्क्यांच्या आसपास येतो. ही आकडेवारी पाहता अनेक ठिकाणी लिंगायत समाजाची मते निर्णायक ठरू शकतात.

हेही वाचा >>> Who is Anil Deshmukh : काटोलमध्ये सलीलविरुद्ध अर्ज दाखल करणारे ‘अनिल देशमुख’ कोण आहेत ?

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने लिंगायत समाजातील माला जंगम उमेदवाराला लातूर या आरक्षित मतदारसंघातून प्रतिनिधित्व दिले होते. त्याचा मोठा लाभ महाविकास आघाडीला झाला. २०२४ ला काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे ६५ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाले. त्यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांचा पराभव केला. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेले श्रृंगारे हे पावणेतीन लाखांच्या मताधिक्याने विजयी झाले होते. निलंगा मतदारसंघातून काँग्रेसतर्फे डॉ. अरविंद भातांब्रे तर औसा मतदारसंघातून काँग्रेसचेच जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांना उमेदवारी मिळेल, अशी अपेक्षा होती. निलंगा मतदारसंघ महाविकास आघाडीत काँग्रेसकडे मिळूनही काँग्रेसने अरविंद भातांब्रे यांना उमेदवारी न देता अभय साळुंखे यांना दिली. तर औसा मतदारसंघ काँग्रेसऐवजी शिवसेनेकडे गेल्यामुळे श्रीशैल्य उटगे यांची उमेदवारी रद्द झाली. काँग्रेसने फसवणूक केल्याची भावना जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील लिंगायत समुदायात पसरली आहे, असे समाजातील काही धुरिणांना वाटते आहे. त्यावरून लिंगायत मतपेढीचा कल यावेळी बदलेल का, याविषयीचे आडाखे बांधणे सुरू आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 latur assembly constituency lingayat vote in latur print politics news zws