मुंबई : विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार आधी जाहीर करण्यापेक्षा महायुतीने महाराष्ट्राच्या विकासाच्या मुद्द्याला अधिक प्राधान्य दिले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा होत असलेल्या नावांपेक्षा अन्य राज्यांप्रमाणे वेगळ्या नावाचाही विचार होऊ शकतो आणि काही राज्यांमध्ये मुख्यमंत्रीपद भाजपने त्याच नेत्याला पुन्हा दिल्याचीही उदाहरणे आहेत, असे प्रतिपादन भाजपचे केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सोमवारी ‘ लोकसत्ता ’ शी बोलताना येथे केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजपचे केंद्रीय नेते मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील. आपल्याला मुख्यमंत्रीपद किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात नव्हे, तर राष्ट्रीय राजकारणातच रस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महायुतीला किमान १६०-१६५ जागांवर विजय मिळेल, असा विश्वास व्यक्त करीत भाजप व उद्धव ठाकरे हे आता पुन्हा एकत्र येणे अवघड व अशक्य आहे. त्यांच्यात केवळ मतभेद नव्हे, तर मोठे मनभेद झाले आहेत, असे सांगतानाच ‘राजकारणात काहीही घडू शकते’ असे तावडे यांनी नमूद केले.
हेही वाचा : चंद्रपूर जिल्ह्यात तुल्यबळ लढती, राजुऱ्यात शेतकरी संघटनेमुळे चुरस
u
महायुतीने या निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही, याविषयी विचारता तावडे म्हणाले, ‘प्रत्येक निवडणुकीत त्यावेळच्या राजकीय परिस्थितीनुसार आणि अन्य पक्षांशी असलेल्या युतीनुसार वेगवेगळी रणनीती असते. त्यामुळे २०१९ मध्ये भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निवडणुकीआधी जाहीर केला, तरी यंदा केला नाही. महायुतीने राज्याच्या विकासाच्या दृष्टीने केलेल्या कामगिरीच्या आधारावर जनतेकडे कौल मागितला आहे. मुख्यमंत्रीपदासाठी ज्या नावांची चर्चा झाली, त्यापेक्षा नवीन व वेगळ्या उमेदवाराला मध्यप्रदेश, राजस्थान, ओरिसामध्ये मुख्यमंत्रीपद देण्यात आले, मात्र अन्य काही राज्यांमध्ये चर्चेतील नेत्याचीही निवड झाली. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबत महायुतीतील वरिष्ठ नेतेच योग्य वेळी निर्णय घेतील. मला विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी पक्षाच्या नेत्यांनी विचारणा केली होती. पण मला राष्ट्रीय राजकारणातच रहायचे असून पक्षाने बिहार व अन्य जबाबदाऱ्या दिल्या आहेत. बिहारच्या निवडणुकीत भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, यासाठी मी काम करणार आहे. ’
महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर घसरला
महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर घसरला असून एकमेकांवर जहाल वैयक्तिक टीकेमुळे कटुता आली आहे. त्यास सर्वपक्षीय नेते जबाबदार आहेत. मी विरोधी पक्षातील नेता म्हणून काम करीत असताना माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, अजित पवार, सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका करीत होतो. पण वैयक्तिक संबंधांवर त्याचा कधीही परिणाम झाला नाही. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमाला शरद पवार, तर पवार यांच्या ऐशींव्या वाढदिवसाच्या कार्यक्रमास पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असे तावडे म्हणाले.
हेही वाचा : बंडखोरांमुळे भंडारा जिल्ह्यात अटीतटीचे सामने
सरकार बळकट करण्यासाठी निर्णय
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतरही भाजपने ज्या अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध गेली अनेक वर्षे प्रचार केला, त्यांना सत्तेत बरोबर घेतले, ही मतदारांशी प्रतारणा नाही का, असे विचारता तावडे म्हणाले, भाजप व शिंदे यांचे सरकार सत्तेवर असतानाही ते अधिक स्थिर व बळकट करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. स्थिर सरकारच विकासाची मोठी कामे करू शकते, असे त्यांनी नमूद केले. माझे वडील, चिन्ह, पक्षनाव शिंदे यांनी चोरल्याचा आरोप ठाकरे यांनी केला. पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्ववादी विचारांचे होते आणि धनुष्यबाण हे चिन्ह त्याचेच प्रतीक होते. उद्धव ठाकरे यांनी अयोध्येतील राम मंदिर, राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० रद्द करणे आदी निर्णयांना विरोध करणाऱ्या काँग्रेसबरोबर युती केल्याने शिंदे यांच्याकडे पक्षनाव व धनुष्यबाण जाणे, हे हिंदुत्ववादी विचारांच्या दृष्टीने योग्यच आहे. अनुच्छेद ३७० लागू करावे, अशी काँग्रेसची भूमिका असून त्यांनी वक्फ बोर्ड सुधारणांनाही विरोध केला आहे. या मुद्द्यांवर ठाकरे यांची भूमिका काय ? अशी विचारणा तावडे यांनी केली.