वर्धा : वर्धा, देवळी, हिंगणघाट व आर्वी या जिल्ह्यातील चारही मतदारसंघांत महायुती आणि महाविकास आघाडीचे तुल्यबळ उमेदवार रिंगणात असल्याने नेमके चित्र स्पष्ट नसून मतदार काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे. वर्धा मतदारसंघात युतीचे विद्यमान आमदार डॉ. पंकज भोयर, आघाडीचे शेखर शेंडे, अपक्ष डॉ. सचिन पावडे यांच्यासह अपक्ष रवी कोटंबकार, विलास कांबळे, बसपचे विशाल रामटेके यांच्यासह १५ उमेदवार रिंगणात आहेत. भोयर यांचा तिसऱ्यांदा शेंडेंसोबत सामना होत आहे. ही माझी शेवटची निवडणूक, अशी भावनिक साद; की भोयर यांची विकासकामे, यापैकी कोणास पसंती मिळणार, हीच चर्चा. पण पावडे त्यांचा बेरंग करणार, असाही मतप्रवाह येथे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवळीत युतीचे राजेश बकाने विरोधात आघाडीचे रणजित कांबळे, या दुहेरी लढतीस शेतकरी नेते किरण ठाकरे यांनी छेद दिला आहे. कांबळे पराजित होवू शकत नाही, हा दावा कायमचा यावेळी खोडून काढू, असे भाजप नेते म्हणतात. यासाठी भाजपने सर्व ती ताकद पणाला लावल्याने आमदार कांबळे यांना लढत सोपी राहिली नाही. येथील लढत जोरदार असल्याचे काँग्रेस नेतेच सांगतात.

हेही वाचा >>> मविआतील बंडखोरी आदिती तटकरेंच्या पथ्यावर ?

आर्वीने तर उभ्या राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे. खासदार पत्नी मयूरा अमर काळे यांच्याविरोधात युतीचे सुमित वानखेडे, असा थेट सामना येथे आहे. काळे विरोधात भाजपच नव्हे तर त्यांच्या मित्रपक्ष काँग्रेसचे इच्छुक व इतर बहिष्कार टाकून बसले आहेत. म्हणून ही लढाई काळे यांना सोपी राहिली नाही. आपल्या प्रचाराच्या शेवटच्या भाषणात त्यांनी वानखेडेंपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनाच लक्ष्य केल्याची बाब चर्चेत आहे. माझी लढाई कुणाशी, हे दाखवून घराणेशाहीची टीका झाकायची व सहानुभूती मिळवायची, असा हेतू साध्य होणार का, हे पुढेच दिसेल. कारण दोन्ही प्रमुख उमेदवार प्रथमच रिंगणात आहेत. हिंगणघाट मतदारसंघात युतीचे आमदार समीर कुणावार, आघाडीचे अतुल वांदिले व बंडखोर राजू तिमांडे यांच्यात मुख्य लढत आहे. तिमांडे यांची उमेदवारी कोणाच्या पथ्यवार पडणार, याची मतदारच खुली चर्चा करीत असल्याने निकालाचे आश्चर्य वाटणार नाही, असे नेतेमंडळी बोलतात. जिल्ह्यात अलीकडच्या काळात भाजपने भक्कम पाय रोवले. शंभर टक्के भाजपमय करणार, हा भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा दावा असल्याने आघाडी सतर्क आहे.