छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील बीड व संभाजीगर जिल्ह्यात बाचाबाची, कार्यकर्त्यांच्या दोन गटांत हाणामारींबरोबर बीड जिल्ह्यातील घाटनांदूर येथे मतदान यंत्र फोडण्याचा प्रयत्न झाला. तसेच परळी मतदारसंघातील धर्मापुरी येथे ओबीसी मतदारांना मतदान केंद्रापर्यंत येऊच दिले नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी केला. बीड जिल्ह्यातील हाणामाऱ्यांच्या प्रकारामुळे जिल्हाधिकारी अविनाश पाठक हेही सत्ताधाऱ्यांना मदत करत असल्याचा आरोप करण्यात आला. असे काही प्रकार वगळता मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांत मतदान शांततेमध्ये झाले. मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांमध्ये ६२ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान नोंदविण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संभाजीनगर शहरातील पश्चिमचे उमेदवार संजय शिरसाट यांनी शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या शहराध्यक्षांना धमकी दिल्याचे छायाचित्रणही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी समाजमाध्यमांमध्ये प्रसारित केले. शहरातील वाळुज परिसरात उमेदवार राजू शिंदे आल्यानंतर गर्दी झाली. मतदान केंद्राच्या भागात कार्यकर्त्यांना पोलीस मारहारण करत असल्याचा आरोप करण्यात आला. मतदानाच्या वेळेनंतर झालेली गर्दी रोखण्यासाठी लाठीजार्च करण्यात आला. त्यानंतर या भागात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार राजू शिंदे यांनी रस्त्यावर बसून आंदोलन केले.

हेही वाचा : मराठवाडा : आरक्षण, जरांगे आणि नातीगोती

मतदानावरून अनेक ठिकाणी तक्रारी, गोंधळ, आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. गोंधळाने काही वेळ मतदानही थांबवण्यात आल्याचे प्रकार घडले. विशेषत: परळी मतदारसंघात निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या केंद्राध्यक्षांना एक-दोन कार्यकर्त्याने दमदाटीची भाषा वापरत गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संदर्भातील चित्रफीत समाजमाध्यमावर वेगाने प्रसारित झाली होती.

परळी विधानसभा मतदारसंघात घाटनांदूरमध्ये मतदान यंत्रच फोडण्यात आल्याचा प्रकार घडला. या माहितीला दुजोरा देताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना तिडके यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. यंत्र फोडण्याच्या घटना मुरंब्री व सोसेवाडी गावातही घडल्या असून, तीन प्रकारांपैकी एका ठिकाणी यंत्र बदलण्यात आले. तर उर्वरित दोन ठिकाणी विजेरी बदलून पुन्हा मतदान सुरू करण्यात आले.

हेही वाचा : कालीचरण महाराजांच्या सभा आयोजनात संबंध नाही, वादग्रस्त वक्तव्यावर संजय शिरसाटांचे स्पष्टीकरण, जरांगे यांचीही भेट

धक्के देऊन बाहेर काढले

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार अब्दुल सत्तार यांच्या शिक्षण संस्थेतील शिक्षक पैसे वाटण्यासाठी आल्याचे वाटल्याने गावकऱ्यांनी त्यांना धक्के देऊन बाहेर काढले. बीड जिल्ह्यात हाणामारी, मतदान केंद्र ताब्यात घेण्याच्या आरोपापासून ते सरकारी यंत्रणाच सत्ताधारी गटास मदत करत असल्याचे आरोप करण्यात आले.

गोंधळ अन् वादावादी

● परळी शहरातील बँक कॉलनीमध्ये अॅड. माधव जाधव यांना मारहाण करण्यात आली. जाधव यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. धर्मापुरीमध्येही केंद्रावर सीसीटीव्ही बंद ठेवण्यावरून वाद झाला.

हेही वाचा : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक : संयुक्त संसदीय समितीचा अहवाल हिवाळी अधिवेशनात सादर होण्याची शक्यता कमीच, कारण काय?

● राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी धर्मापुरी केंद्रावरील अधिकाऱ्याला धारेवर धरले. त्यांच्याशी झालेले आक्रमक संभाषण समाजमाध्यमावर प्रसारित झाले होते.

● केज या राखीव विधानसभा मतदारसंघात विडा व एका ग्रामीण भागात मतदान केंद्रातील व्यवस्थेमध्ये मतदानादरम्यान गोंधळ आणि वादावादी झाली. आष्टी मतदारसंघातील बेदरवाडीत दोन गटांत मतदानावेळी वाद झाले.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 marathwada over 62 percent voter turnout evm machines vandalized print politics news css