छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी निर्माण केलेल्या भाजपविरोधी वातावरणाला हवा देण्याचे पुरेपूर प्रयत्न महाविकास आघाडीने केले. त्यामुळेच की काय, शिवसेना (एकनाथ शिंदे) यांच्याशी बहुतांश मतदारसंघात लढत असताना उद्धव ठाकरे यांनी भाजपविरोधी सूर उंचावला. प्रचारात आरक्षणाचा कोटा वाढविण्याच्या आश्वासनाशिवाय जातीच्या गणितांवर काँग्रेसची भिस्त होती तर, भाजपने ‘एक है तो सेफ है’ची भाषा वापरत त्याला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मराठवाड्यातील ४६ मतदारसंघात ‘मराठा – मुस्लीम -दलित’ ही मतपेढी कायम राहते की नाही, याची उत्सुकता आहे.
मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्याची राजकीय ओळख, मतदानाचे प्रारूप वेगवेगळे. शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये सहा पक्ष फुटीनंतर २०१९ च्या तुलनेत भाजपने पाच जागा कमी घेतल्या. गंगाखेड मतदारसंघात रत्नाकर गुट्टे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर करावे लागले. मराठवाड्यातील २० मतदारसंघात भाजप कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहे. लढतीमध्ये लातूर आणि बीड जिल्ह्यात शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षास उमेदवार देता आले नाहीत. तर राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षास छत्रपती संभाजीनगर, जालना, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये उमेदवार देण्याची संधी महायुतीमध्ये मिळाली नाही.
महाविकास आघाडीमध्ये आष्टी, संभाजीनगर पूर्व व तुळजापूर या तीन जागांवर मैत्रीपूर्ण लढत आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सोयाबीन दराबद्दलच्या रोषाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला. लाडकी बहीण, पाण्याच्या योजना, उद्याोगातील गुंतवणूक या मुद्द्यांच्या आधारे आणि आरक्षणाचे भयगंड बाळगत भाजपने प्रचारात बरेच रान कापले खरे; पण मतदानापर्यंत ते टिकेल का, याची चर्चा सुरू आहे.
हेही वाचा : धारावीच्या भोवतीच प्रचार
जरांगे यांच्यामुळे विरोधाची सारी धार आपोआप तयार होईल त्यावर फक्त स्वार होऊ अशाच प्रकारे काँग्रेसचे नेते वागले. जरांगे यांनी उमेदवारीची घोषणा करून त्यातही माघार घेतली ते आंतरवली सराटीमध्ये बसून राहिले. येवला येथे ते एकदा गेले. मात्र, मराठवाड्यात ते फिरले नाहीत. त्यामुळे भाजपविरोधी मतांचे एकत्रीकरण करण्यात पुढाकार घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व उद्धव ठाकरे गटाचे एकत्रित प्रयत्न दिसून आले नाहीत. त्यामुळे मराठा मतपेढी अनेक मतदारसंघात संभ्रमात असल्याचे दिसून आले.
अनेक मतदारसंघात छुप्या युती आणि आघाडीही या निवडणुकीत दिसून आली. अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनीही उद्धव ठाकरे गटाचे काम केले. अनेक मतदारसंघात काँग्रेसचे नेते एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारास मदत करत होते. त्यामुळे नेत्यांच्या आघाड्यांना तिलांजली देत स्थानिक गणिते नव्याने मांडली गेल्याचे प्रचारात दिसून आले.
प्रचार भरकटलेलाच
आरक्षण, सोयाबीन अधिक जरांगे मराठवाड्यात आरक्षण, सोयाबीनच्या दराचा प्रश्न आणि जरांगे पाटील यांच्याकडून बांधलेल्या मराठा मतपेढीमुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये चुरशीची लढत असण्यामागे अनेक बंडखोर, रिंगणात असणारे खूप सारे उमेदवार यामुळे निवडणुकांमध्ये राज्याचे विषय प्रचारात प्रभावी ठरले नाहीत.
नात्यागोत्यांचा खेळ
संदीप क्षीरसागर आणि डॉ. योगेश क्षीरसागर हे काका पुतणे बीडमध्ये, भाजपचे निवडणूक प्रमुख रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष आणि मुलगी संजना हे भोकरदन आणि कन्नड मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. लातूर जिल्ह्यात अमित देशमुख, धीरज देशमुख हे दोघे बंधू पुन्हा रिंगणात उतरल्याने त्यांच्या आई वैशालीताई, भाऊ अभिनेता रितेश सारे प्रचारात उतरले. भोकरमधून खासदार अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांना पहिल्यांदा विधानसभेतून मैदानात उतरविण्यात आले. धनंजय मुंडे यांच्यासाठी बहीण पंकजा मुंडे प्रचारात होत्या.
वादग्रस्त मुद्दे
कळमनुरी मतदारसंघात संतोष बांगर यांच्या मतदारसंघात हाणामारीच्या घटना. पैसेवाटपाचे आरोप.
ओबीसी आरक्षणाचे समर्थक प्रा. हाके यांच्या गाडीवर दगडफेक.
अनेक ठिकाणी कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त
एकूण मतदार संघ ४६
प्रमुख लढती
● घनसावंगी – राजेश टोपे विरुद्ध हिकमत उडाण, ● लातूर शहर: अमित देशमुख – अमित चव्हाण , ● भोकर : श्रीजया चव्हाण – तिरुपती कोंडेकर, ● परंडा : तानाजी सावंत – राहुल मोटे, ● औरंगाबाद पूर्व : अतुल सावे – इम्तियाज जलील, ● परळी : धनंजय मुंडे – राजेसाहेब देशमुख.