छत्रपती संभाजीनगर : कृषी समस्येमुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांनी ‘जाती’चा चेहरा पुढे करून आरक्षण आंदोलनात जरांगे यांना नायक केले. जरांगे यांनी आंदोलनातून भरलेला भाजपविरोधी रोष काही मतदारसंघांत विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकला. त्याला सोयाबीनच्या न वाढलेल्या दराची जोड होती. त्याबरोबरच पैसेवाटपाच्या घटनांनी ‘कॅश’ हादेखील मतदानाचा मुद्दा बनवला. ‘कॅश’, ‘कास्ट’ आणि ‘क्रॉप’ हे तिन्ही मुद्दे मराठवाड्यात मतदारांसाठी महत्त्वाचे होते. केवळ प्राधान्यक्रम मतदारसंघनिहाय बदलत राहिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लाडकी बहीण योजनेतून मिळणारी रक्कम हा निवडणुकीतील खऱ्या अर्थाने अधिकृत ‘पैसे’ हाच मुद्दा होता. याच काळात उमेदवार देण्यापासून मतदान होईपर्यंत मराठवाड्यात ‘जाती’चे ध्रुवीकरण किती हे मोजले जात होते. महाविकास आघाडी जरांगे यांच्या खांद्यावर विसंबून होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी बहुतांश मराठा पुढारी वेळ न दवडता भाजपमध्ये जात होते. साखर कारखाने, शैक्षणिक संस्था चालविणारा गावातील प्रस्थापित पुढारी भाजपमध्ये जाताना त्याच्याविषयी असणारा रागही भाजपकडे वळत होता. त्यामुळे आरक्षण आंदोलन मोठे होत गेले. त्याचे परिणाम लोकसभेत दिसले आणि विधानसभेतही त्याचा परिणाम असल्याचे मतदानातून दिसेल, असा आता मराठा नेत्यांचा दावा आहे.

हेही वाचा :Devendra Fadnavis: मतटक्का वाढण्यामागे ‘लाडकी बहीण’, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे मत

मुस्लीम मतदारांच्या रांगा ‘मशाल’ चिन्ह लावलेल्या शिवसेनेच्या शामियानाबाहेर दिसून येत होत्या. याला संभाजीनगर शहरातील औरंगाबाद पूर्व आणि मध्य हे दोन विधानसभा मतदारसंघ अपवाद. संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर मतदारसंघात मराठा मतपेढी एकवटली होती. मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांत धाराशिव, जालना, हिंगोली, परभणी, तसेच नांदेड जिल्ह्यातील चार मतदारसंघांत जातीची गणिते अधिक मजबूत होती, असा दावा केला जात आहे. लातूर जिल्ह्यात काँग्रेस नेते शिवराज पाटील-चाकूरकर यांच्यामागे राहिलेली लिंगायत मतपेढी अर्चना पाटील-चाकूरकर यांच्याबरोबर भाजपकडे वळल्याचे दावे केले जात आहेत. त्याचवेळी उमरगा मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माला जंगम यांच्यामागेही लिंगायत मते एकवटल्याची चर्चा आहे.

हेही वाचा : तीनच उमेदवार असलेल्या शहाद्यात वाढीव मतटक्क्यामुळे चुरस

लोकसभेतील मराठा जातीची एकगठ्ठा मते वळविण्यासाठी बऱ्याच कसरती मराठवाड्यात झाल्या. त्यामुळे पैसा, जात आणि कृषिमालाचे दर हेच निवडणुकीतील मतदानादिवशीचे कळीचे मुद्दे असल्याचे दिसून येत आहे. सोयाबीनच्या न वाढलेल्या भावाचाही परिणाम सत्ताधारी गटावर होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे. त्याचवेळी ‘लाडक्या बहिणीं’चा मतदानातील लक्षणीय सहभाग सत्ताधारी महायुतीला तारक ठरणार का, हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 marathwada voting issues priorities changed cash caste crop print politics news css