अमरावती : आदिवासीबहुल मेळघाट विधानसभा मतदारसंघात यावेळी दोन माजी आमदारपुत्रांची लढाई गाजत आहे. त्यातच काँग्रेसने नवीन उमेदवारावर डाव खेळला आहे. भाजपने हा गड पुन्हा काबिज करण्याचा प्रयत्न चालवलेला असताना प्रहार जनशक्ती पक्षासाठी ही लढत प्रतिष्ठेची बनली आहे. भाजपने माजी आमदार तु.रू. काळे यांचे चिरंजीव केवलराम काळे यांना उमेदवारी दिली आहे, तर त्यांच्या विरोधात माजी आमदार दयाराम पटेल यांचे पुत्र राजकुमार पटेल हे प्रहार जनशक्ती पक्षाचा झेंडा घेऊन उभे आहेत. काँग्रेसचे डॉ. हेमंत चिमोटे हे प्रथमच निवडणूक लढतीत आहेत.
मेळघाट हा सुरूवातीपासून काँग्रेसचा गड मानला जात होता. काँग्रेसच्या या वर्चस्वाला भाजपने १९९५ मध्ये सुरूंग लावला. २००९ पर्यंत मेळघाट मतदारसंघ भाजपकडे होता. २००९ मध्ये पुन्हा काँग्रेसने हिसकावून घेतला. मात्र, २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेत काँग्रेसला तो टिकवता आला नाही. प्रथमच निवडणूक लढविणारे प्रभुदास भिलावेकर हे निवडून आले होते. गेल्या निवडणुकीत भाजपने प्रभुदास भिलावेकर यांच्याऐवजी प्रशासकीय अधिकारी असलेले रमेश मावस्कर यांना उमेदवारी दिली, पण प्रहार जनशक्ती पक्षाचे राजकुमार पटेल यांनी त्यांचा पराभव केला होता. केवलराम काळे यांनी काँग्रेसची उमेदवारी मागितली होती, पण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आली आणि राष्ट्रवादीने केवलराम काळे यांना उमेदवारी दिली. पण, त्यांना चांगली कामगिरी करता आली नव्हती.
हेही वाचा : ब्रम्हपुरीत विजय वडेट्टीवार यांच्यासाठी सोपी लढत!
काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे केवलराम काळे हे भाजपचे उमेदवार आहेत. २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर केवलराम काळे यांनी तेव्हाचे भाजपचे उमेदवार राजकुमार पटेल यांचा पराभव केला होता. केवळ ७१० मतांनी पटेल यांना पराभव पत्करावा लागला होता. आता हे दोन माजी आमदार पुन्हा एकदा समोरा-समोर आहेत.
सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या मेळघाटात बहुसंख्य आदिवासी राहतात. यामुळे मेळघाट विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा आणि धारणी या दोन तालुक्यांमध्ये मेळघाट विस्तारला असून मेळघाट विधानसभा मतदारसंघातील काही गावे ही अचलपूर तालुक्यात देखील येतात.
हेही वाचा : मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
गेली पाच वर्षे आमदार बच्चू कडू आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्यात सतत खटके उडायचे. राजकुमार पटेल यांनी देखील नवनीत राणा यांच्या विरोधात सातत्याने भूमिका घेतली. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांच्या पराभवासाठी बच्चू कडू यांच्यासोबतच राजकुमार पटेल यांनी देखील मोठी ताकद लावली. राजकुमार पटेल यांनी महायुतीतील शिवसेना शिंदे गटाकडे उमेदवारी मागितली. त्यासाठी प्रहार पक्षातून ते बाहेरही पडले, पण भाजपने ही जागा मिळवल्याने नाईलाजाने राजकुमार पटेल यांना प्रहारमध्ये परतावे लागले. या ठिकाणी भाजप, प्रहार आणि काँग्रेसमध्ये तिरंगी सामना आहे.