मुंबई : राज्यात ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाले असताना मुंबईत ५४ टक्केच मतदान झाले. मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. मुंबईत लाटेवार स्वार होत मतदान होते, असा आजवरचा अनुभव असला तरी तशी कोणती लाटही यंदा दिसली नाही. मुंबईत प्रभावी असा कोणताच घटक नव्हता. लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेस नेते राहुल गांधी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील प्रचारात धारावीच्या मुद्दावर भर दिला होता.
धारावी पुनर्वसन प्रकल्पात मुंबईतील जमिनी अदानी समुहाला आंदण दिल्या जात असल्याचा आरोप उभय नेत्यांनी केला होता. धारावीवरून शिवसेना (ठाकरे) वा काँग्रेसने वातावरण तापविले त्या धारावीतही मतदारांमध्ये निरुत्साह दिसला. धारावीत जेमतेम ५० टक्के मतदान झाले. लोकसभेच्या वेळी धारावीत साधारणपणे तेवढेच मतदान झाले होते. लोकसभा निवडणुकीत मुलुंडमध्ये धारावी पुनर्विकासावरून वातावरण तापले होते. कारण धारावीतील प्रकल्पग्रस्तांचे मुलुंड पूर्व भागात पुनर्वसन करण्यात येणार आहे. याविरोधात मुलुंड पूर्वमधील रहिवाशांमध्ये तीव्र असंतोष होता. त्याचे प्रत्यंतर मतदानात उमटले होते. यंदा मुलुंड र्पू्वमध्ये धारावी प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन हा मुद्दा तेवढा प्रभावी नव्हता. शहरात जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास हा मुद्दा प्रचारात होता. उपनगरांमध्ये झोपडपट्टी पुनर्विकास यावर भर देण्यात आला होता.
हेही वाचा : कोणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्यास राज्यपालांची भूमिका निर्णायक
मुंबई शहरात ५२ टक्के तर उपनगरात ५६ टक्के मतदान झाले. कुलाबा, धारावी, भायखळ्यात मतदारांमध्ये निरुत्साह होता. बोरिवली, मुलुंड आणि भांडूप पश्चिम या तीन मतदारसंघांमध्येच ६० टक्क्यांची आकडेवारी गाठली. कुलाब्यातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी बरेच प्रयत्न करूनही ४४ टक्केच मतदार मतदानाला बाहेर पडले.
लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत मुंबईत लाटेवर स्वार होत मतदार मतदान करतात, असा अनुभव आहे. १९७८ मध्ये मुंबईकरांनी जनता पक्षाला कौल दिला होता. १९९५ मध्ये मुंबईतील सर्व जागा शिवसेना व भाजप युतीने जिंकल्या होत्या. २०१४ आणि २०१९ मध्ये मोदी लाटेत मुंबईकरांनी भाजपला साथ दिली. २००९ मध्ये मनसेची लाट होती त्याचा फायदा काँग्रेसला झाला होता. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत संविधानाच्या मुद्दावर वातावरण तापले असताना , मुंबईकरांनी काँग्रेस-शिवसेनेला (ठाकरे)कौल दिला होता.
हेही वाचा :Devendra Fadnavis: मतटक्का वाढण्यामागे ‘लाडकी बहीण’, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे मत
मतदानासाठी रांगा नाहीत
लोकसभा निवडणुकीच्या वेळी मुस्लीमबहुल तसेच झोपडपट्ट्यांच्या परिसरात मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. विधानसभा मतदानात तेवढ्या रांगा दिसल्या नाहीत. ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’, मुंबई तोडण्याचा डाव, मुंबईचे गुजरातीकरण होऊ देणार नाही, अशा घोषणा मुंबईत प्रचारात गाजल्या. पण त्याचा मतदारांवर कितपत प्रभाव पडला यासाठी निकालाची प्रतीक्षा .