अमरावती : विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची अधिकृत उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष अर्ज दाखल केलेल्या बंडखोरांची सर्वच पक्षांकडून मनधरणी सुरू आहे. चार नोव्हेंबरपर्यंत बंडखोरी नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने बंडखोरांसोबत बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. मात्र, अनेक बंडखोरांनी संघर्षाचा पवित्रा घेतला आहे.

काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) यांची महाविकास आघाडी, भाजपच्या नेतृत्वाखालील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महायुती, या दोन आघाड्यांमुळे जागावाटपात मर्यादा आल्या. मोर्शीत तर राष्‍ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि भाजपचे उमेदवार समोरा-समोर आले आहेत. दोन पैकी कुणी माघार घेणार की, मैत्रिपूर्ण लढत होणार, याचा निर्णय वरिष्‍ठ पातळीवरच होणार आहे.

दुसरीकडे, मोर्शीत राष्‍ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार गिरीश कराळे यांच्‍या विरोधात विक्रम ठाकरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे. ही बंडखोरी रोखण्‍यासाठी आता महाविकास आघाडीकडून प्रयत्‍न सुरू झाले आहेत.

हेही वाचा >>> काँग्रेसकडून सामान्य कार्यकर्त्याला न्याय, भाजपकडून अन्याय; चंद्रपुरात चर्चा

वर्धा मतदारसंघाचे राष्‍ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार अमर काळे यांच्‍यावर समन्‍वयाची जबाबदारी देण्‍यात आली आहे. पण, विक्रम ठाकरे हे बंडखोरीच्‍या निर्णयावर ठाम असल्‍याचे कळते.

बडनेरा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उमेदवार सुनील खराटे यांच्‍या विरोधात बंडाचे निशाण फडविणाऱ्या प्रीती बंड यांची स्‍थानिक पातळीवर समजूत काढण्‍याचे प्रयत्‍न सुरू झाले आहेत. पण, त्‍यांनी निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्‍यांचा आग्रह आहे. दुसरीकडे, युवा स्‍वाभिमान पक्षाचे रवी राणा यांना भाजपने पाठिंबा दिला असला, तरी भाजपचे बंडखोर तुषार भारतीय यांनी संघर्षाचा पवित्रा घेतला आहे. तुषार भारतीय हे भाजपचे विधानपरिषद सदस्‍य श्रीकांत भारतीय यांचे बंधू आहेत. तुषार भारतीय यांनी बंडखोरी करू नये, यासाठी सुरूवातीलाच त्‍यांची समजूत काढण्‍याचा प्रयत्‍न झाला, पण ते लढण्‍यावर ठाम आहेत.

हेही वाचा >>> Maharashtra Assembly Election 2024: स्वपक्षीय व मित्रपक्षाचे बंडखोर, बेदखल ठरणार काय बंडखोरी ?

मेळघाटमध्‍ये भाजपचे बंडखोर माजी आमदार प्रभुदास भिलावेकर आणि ज्‍योती सोळंके यांची समजूत काढण्‍याचा प्रयत्‍न माजी खासदार नवनीत राणा यांच्‍या गटाकडून सुरू आहे, पण त्‍याला ते कितपत प्रतिसाद देतात, हे ४ तारखेपर्यंत स्‍पष्‍ट होणार आहे. अचलपूरमध्‍ये भाजपचे बंडखोर ठाकूर प्रमोदसिंह गड्रेल, नंदकिशोर वासनकर आणि अक्षरा लहाने हे तिघे काय भूमिका घेतात, हे येत्‍या दोन दिवसांत स्‍पष्‍ट होणार आहे.

तिवसा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर रविराज देशमुख यांची समजूत काढण्‍याचे काम खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्‍या गटाकडून सुरू आहे. भाजपने या ठिकाणी शिवसेनेतून भाजपमध्‍ये आलेले राजेश वानखडे यांना उमेदवारी दिल्‍याने रविराज देशमुख नाराज झाले आहेत. अमरावतीत भाजपचे बंडखोर जगदीश गुप्‍ता हे आपल्‍या निर्णयावर ठाम आहेत. दुसरीकडे, दर्यापूरमध्‍ये युवा स्‍वाभिमान पक्षाचे रमेश बुंदिले यांनी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) अभिजीत अडसूळ यांच्‍या अडचणी वाढविल्‍या आहेत.