नाशिक : उत्तर महाराष्ट्रातील ३५ पैकी ३३ जागा जिंकून महायुतीने महाविकास आघाडीचा दारुण पराभव केला. उत्तर महाराष्ट्रात आतापर्यंतच्या निवडणुकांमध्ये कोणत्याही आघाडीने असे विक्रमी यश मिळविण्याची ही पहिलीच वेळ आहे. विरोधकांना नवापूर आणि मालेगाव मध्य या दोनच जागा जिंकता आल्या. शिवसेना (उद्धव ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार), मनसे, वंचित बहुजन आघाडीसह इतर कोणालाही खाते उघडता आले नाही. नाशिक जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. जिल्ह्यातील १५ पैकी राष्ट्रवादीने (अजित पवार) सर्वाधिक सात, भाजपने पाच तर, शिवसेनेने (एकनाथ शिंदे) दोन जागा जिंकल्या. एमआयएमने मालेगाव मध्यची जागा राखण्यात यश मिळविले.
हेही वाचा :मराठवाडा : ४६ पैकी ४० जागांवर महायुतीचा भगवा, महायुतीचे ‘रक्षाबंधन’! भाजपची विजयाची कमान चढती
जिल्ह्यातील या निकालाचे वैशिष्ट्ये म्हणजे मागील विधानसभेत दिसणारे सर्व आमदार नवीन विधानसभेत दिसणार आहेत. त्यात एकही नवीन चेहरा नाही. जिल्ह्यातील दोन्ही मंत्री दादा भुसे आणि छगन भुजबळ विजयी झाले. बागलाण मतदारसंघात भाजपचे दिलीप बोरसे यांनी जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्याने (एक लाख ३० हजार) विजयश्री मिळवली.
जळगाव जिल्ह्यातील सर्व ११ मतदार संघात महायुतीने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. काँग्रेसच्या ताब्यात असलेली एकमेव रावेरची जागाही महायुतीने खेचून घेतली. जिल्ह्यातील महायुतीचे गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटील हे तीनही मंत्री विजयी झाले. पाचोऱ्यातील शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) किशोर पाटील आणि शिवसेनेच्या (उध्दव ठाकरे) वैशाली सूर्यवंशी या बहीण-भावातील लढतीत बहिणीचा पराभव झाला.
मुक्ताईनगरात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे पराभूत झाल्या. धुळे जिल्ह्यातही महायुतीने सर्व पाच जागा जिंकताना धुळे शहर आणि धुळे ग्रामीण या दोन्ही जागा विरोधकांकडून खेचून घेतल्या. धुळे ग्रामीणमध्ये भाजपचे नवोदित उमेदवार राम भदाणे यांनी आमदार कुणाल पाटील यांचा पराभव केल्याने काँग्रेसकडे एकही जागा उरली नाही. धुळे शहर मतदार संघात भाजपचे अनुप अग्रवाल यांनी एमआयएमचे आमदार फारुक शाह यांचा पराभव केला.
हेही वाचा : पश्चिम महाराष्ट्र : बालेकिल्ल्यात काँग्रेस भुईसपाट, ७० जागांपैकी ५६वर महायुती, पुण्यात अजित पवारच ‘दादा’
एक लाखापेक्षा अधिक मताधिक्क्याने तिघांचा विजय
उत्तर महाराष्ट्रात एक लाखापेक्षा अधिक मताधिक्याने तीन जण विजयी झाले असून त्यात शिरपूरमधून भाजपचे काशिराम पावरा हे १,४५,९४४ मतांनी, बागलाणमधून भाजपचे दिलीप बोरसे १,२९,६३८ तर, मालेगाव बाह्यमधून शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) दादा भुसे १,०६,६०६ मताधिक्याने विजयी झाले.
मालेगाव मध्यचा निकाल राखीव
मालेगाव मध्य मतदार संघात ‘एमआयएम’चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी इस्लाम पार्टीचे आसिफ शेख यांचा अवघ्या ७५ मतांनी पराभव केला आहे. मौलाना यांना एक लाख नऊ हजार ३३२ मते तर, शेख यांना एक लाख नऊ हजार २५७ मते मिळाली आहेत. समाजवादी पार्टीच्या शान-ए- हिंद व काँग्रेसचे एजाज बेग यांना अनुक्रमे नऊ हजार ५८० व सात हजार ५२७ मते मिळाली. मतमोजणीच्या दहाव्या फेरीपर्यंत शेख हे आघाडीवर होते. नंतर कधी शेख तर कधी मौलाना यांना आघाडी असा सापशिडीचा खेळ सुरू राहिला. अखेरच्या २५ व्या फेरीत मौलाना यांनी ७५ मतांची आघाडी घेत शेख यांच्यावर मात केली. प्रतिस्पर्धी उमेदवार शेख यांच्याकडून हरकत घेतली गेल्याने सायंकाळी उशिरापर्यंत निकाल जाहीर झालेला नव्हता. मात्र लेखी उत्तर दिल्यावर हा निकाल जाहीर होणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला धक्का; महाराष्ट्रात निराशा अन् झारखंडमध्येही पक्ष कमकुवत, कारण काय?
प्रमुख विजयी उमेदवार
●काशिराम पावरा (शिरपूर, भाजप)
●दिलीप बोरसे (बागलाण, भाजप)
●दादा भुसे ( मालेगाव बाह्य, शिवसेना (शिंदे)
●राम भदाणे (धुळे ग्रामीण, भाजप)
●अनुप अग्रवाल (धुळे शहर-भाजप)
●गिरीश महाजन (जामनेर – भाजप)
●डॉ. विजयकुमार गावित (नंदूरबार – भाजप)
हेही वाचा : महायुतीची ‘सत्ता’वापसी; लोकसभेत पराभूत झालेल्या १०५ जागांवर विजयी
प्रमुख पराभूत उमेदवार
●डॉ. हिना गावित (अक्कलकुवा, अपक्ष)
● रोहिणी खडसे (मुक्ताईनगर, राष्ट्रवादी (शरद)
●जीवा पांडू गावीत (कळवण, माकप)
●शिरीष कुमार कोतवाल (चांदवड, काँग्रेस)
●उन्मेष पाटील (चाळीसगाव, शिवसेना (ठाकरे)