बडनेरा

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : महायुती आणि महाविकास आघाडीत झालेली बंडखोरी, उमेदवारांची भाऊगर्दी आणि राजकीय निष्ठांची गुंतागुंत या पार्श्वभूमीवर जातीय मतविभागणीवर विजयाचे गणित अवलंबून असणाऱ्या बडनेरा मतदारसंघात बहुरंगी लढत होत आहे. भाजपचा पाठिंबा मिळवणारे युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवी राणा यांच्या विरोधात सर्व जण एकवटल्याचे चित्र आहे. बंडखोरीमुळे मतांचे विभाजन निश्चित मानले जात असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

गेल्या निवडणुकीत राणा यांनी शिवसेनेच्या प्रीती बंड यांचा पराभव केला होता. यंदा प्रीती बंड यांना शिवसेनेची (उद्धव ठाकरे) उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंड पुकारले. दुसरीकडे रवी राणांच्या विरोधात भाजपचे माजी नगरसेवक तुषार भारतीय यांनी बंडखोरी केली. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे सुनील खराटे, अपक्ष नितीन कदम यांच्यासह २६ उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आलेल्या रवी राणांनी लगेच भाजपला दिलेला पाठिंबा, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठणाचा वाद, ‘हिंदुत्वा’ची तयार केलेली ‘कार्यक्रम पत्रिका’ यातून प्रसिद्धी मिळवली. पण यामुळे दलित आणि मुस्लीम मतदार दुरावल्याची बाब ओळखून रवी राणांनी या वेळी ‘हिंदुत्वा’चा मुद्दा थोडा बाजूला सारला आहे.

हेही वाचा >>> आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य

घरोघरी किराणा आणि साडी वाटपातून मतदारांना आपलेसे करण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीवर विरोधक टीका करीत असले, तरी राणा आपल्या कृतीचे समर्थन करतात. भाजपमधील त्यांचा वाढता हस्तक्षेपही अनेकांना खटकणारा ठरला आहे. या वेळी प्रस्थापित विरोधी मतांचा प्रवाह रोखण्यासाठी राणांना प्रयत्न करावे लागत आहेत. लोकसभा निवडणुकीत मतदारांना नवनीत राणा यांना घरी बसविले. आता रवी राणा यांचे भवितव्य काय, याची चर्चा सुरू झाली आहे.

लोकसभेतील राजकीय चित्र

● महायुती- १,००,१२४ ● महाविकास आघाडी – ७३,३६१

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 opposition united against ravi rana badnera assembly constituency print politics news zws