सांंगली : पलूस-कडेगाव मतदारसंघात काँग्रेसचे युवा नेतृत्व डॉ. विश्‍वजित कदम आणि भाजपचे संग्रामसिंह देशमुख यांच्यातील पारंपरिक लढतीत यावेळी बदलत्या राजकीय मांडणीत चुरस पाहण्यास मिळत आहे. या मतदारसंघातील कदम-देशमुख या संघर्षाला कुंडलच्या लाड गटाचा असलेला तिसरा कोन सध्या तरी कदमांच्या कंपूत परतला असला तरी महाविकासआघाडी विरुद्ध महायुतीतील सामना लक्ष्यवेधी ठरण्याची चिन्हे आहेत. दोन्ही उमेदवार साखर कारखान्याशी संबंधित असल्याने आणि उपसा सिंचन योजनांच्या पाण्यामुळे सधनतेच्या मार्गावर आलेला या मतदारसंघात घाटाखालचा आणि घाटावरचा या वादाला मात्र या निवडणुकीत फारसे स्थान मिळेल असे वाटत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मतदारसंघात २०१९ मध्ये काँग्रेसकडून डॉ. कदम मैदानात होते. त्यावेळी युतीमध्ये ही जागा शिवसेनेला गेली होती. शिवसेनेने दिलेल्या उमेदवारापेक्षा या मतदारसंघात नोटाला झालेले मतदान लक्षणीय होते. कारण इथला मतदार देशमुख अथवा कदम या दोन गटातच विभागला जातो असा आजपर्यंतचा अनुभव आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत या मतदारसंघातील क्रांती कारखान्याचे आमदार अरूण लाड हे मैदानात होते, तर विरोधात जिल्हा परिषदेचे माजी आध्यक्ष देशमुख होते. मात्र, भारती विद्यापीठातील ५० हजार पदवीधर मतदारांच्या जोरावर लाड यांना मदत केल्याचा दावा करून डॉ. कदम यांना पैरा फेडण्याची आठवण पहिल्याच प्रचार सभेत दिली. मात्र, वरिष्ठांनी सांगितल्याविना आपण प्रचारात सहभागी होणार नाही अशी भूमिका आ. लाड व त्यांचे पुत्र क्रांती कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी घेतली. यावरून कदम व लाड यांच्यात धुसफूस सुरू होती. मात्र, आघाडीच्या नेत्यांनी हस्तक्षेप करत हा वाद सध्या तरी शीतपेटीत बंद केला आहे.

हेही वाचा – अहेरीत अम्ब्रीशराव आत्रामांना भाजपचा छुपा पाठिंबा? बंडखोरीनंतरही पक्षाकडून कारवाई नाही

डॉ. कदम यांनी सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष विशाल पाटील यांच्यासाठी जोरदार प्रयत्न केले. त्यांना निवडून आणण्यात त्यांचा वाटा अधिक होता. याचवेळी या मतदारसंघात देशमुखांच्या वाड्यावर दुफळी माजल्याचे दिसून आले. संग्रामसिंह देशमुख यांनी भाजपच्या संजयकाका पाटील यांचा प्रामाणिक प्रचार केला तर त्यांचे बंधू तथा माजी आमदार पृथ्वीराज देशमुखांनी पडद्याआड राहून विशाल पाटलांना मदत केली. या निवडणुकीत याचा परिणाम होतो की नाही हे अजून गुलदस्त्यात असले तरी देशमुख गटातील मतभेद कदमांना फारसे उपयुक्त ठरणारे नाहीत. आमदार डॉ. कदम यांची कामानिमित्त भेट घ्यायची झाली तर सामान्यांना सहजासहजी भेट मिळत नाही. संपर्क टाळण्याचे त्यांचे प्रयत्न आणि कोशात राहण्याची भूमिका सामान्य मतदारांना रूचणारी नाही. शिक्षण क्षेत्राच्या माध्यमातून जे लाभार्थी आहेत त्यांची पिढी आता मावळतीकडे आहे. नव्या पिढीला स्व. पतंगराव कदम यांचे योगदान, धडाडी, निर्णय क्षमता याची आठवण मात्र येत राहणार आहे. तो वारसा जपला जात असल्याचे मात्र, दिसत नाही.

डोंगराई देवीच्या खोर्‍यासह चौरंगीनाथाच्या नजरेच्या टप्प्यातील पलूस-कडेगाव मतदार संघ. अवघे सात रूपये खिशात टाकून लोखंडी पेटी डोकीवर घेउन विद्येचे माहेरघर आणि मराठी संस्कृतीची राजधानी म्हणून ओळखल्या जात असलेल्या पुण्यात जाउन शैक्षणिक क्रांती घडविणारे स्व.डॉ. पतंगराव कदम यांचा हा जसा मतदार संघ तसाच डोंगरकपारीतील शेतीला संजीवनी जर मिळायचीच असेल तर शाश्‍वत पाणी व्यवस्था झाल्याशिवाय पर्याय नाही असे म्हणत चालत आलेले मंत्रीपद लाथाडणारे स्व.संपतराव देशमुख यांचाही. पुर्वीचा वांगी-भिलवडी या नावाने ओळखला जाणारा हा मतदार संघ पुनर्रचनेनंतर पलूस-कडेगाव या दोन तालुक्यांचा झाला. आज या उत्तुंग कर्तत्व निर्माण करणार्‍या नेत्यांच्या पुढच्या पिढीतील राजकीय सत्तासंघर्ष नव्या राजकीय वळणावर आला आहे.

हेही वाचा – Akola Assembly Election 2024 : अकोला जिल्ह्यात चुरशीच्या लढती, जातीय समीकरणे कळीचा मुद्दा; मतांचे गणित जुळवण्यासाठी उमेदवारांची धडपड

या भागातील शेतीचा विकास झाला तो सिंचन योजनांना मिळालेल्या गतीमुळे सोनहिरा, डोंगराई, क्रांती, गोपूज या साखर कारखान्याच्या माध्यमातून उस पट्टा निर्माण झाला. उसाचे पैसे हाती आल्यानंतर कोरडवाहू असलेला हा भाग प्रगतीच्या वाटेवर चालत आहे. पतंगराव कदम यांच्या विचार-आचारात काँग्रेस असली तरी सत्तेसाठी त्यांनाही काँग्रेसशी संघर्ष करावा लागला होता.

देशमुख गटाने २०१४ पासून राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपच्या तंबूत प्रवेश केला. भाजपच्या विस्तारवादी धोरणातून या गटाला राजकीय ताकद मिळत आली आहे. यामुळे आज हा गट तुल्यबळ म्हणून कदम गटाला आव्हान देण्यास नव्या पिढीतही सज्ज झाला आहे. कदम गटाचे नेतृत्व आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांच्याकडे तर देशमुख गटाचे नेतृत्व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्याकडे आहे. पृथ्वीराज देशमुख यांची त्यांना साथ आहे. यामुळे या विधानसभा निवडणुकीत राजकीय संघर्ष हा अस्तित्वाची लढाई म्हणूनच समोर आला आहे आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 palus kadegaon assembly constituency sangli district congress vishwajeet kadam vs bjp sangram singh deshmukh print politics news ssb