अकोला : प्रमुख बंडखोरांच्या बंडाचे निशाण कायम असल्याने अकोला व वाशीम जिल्ह्यातील महायुती व मविआची वाट बिकट झाल्याचे चित्र आहे. बंडखोरांमुळे अकोला पश्चिमचा बालेकिल्ला कायम राखण्याचे आव्हान भाजपपुढे राहणार आहे. रिसोडमध्ये माजी मंत्री अनंतराव देखमुख अपक्ष म्हणून कायम राहिल्याने तिरंगी लढत होईल. बाळापूर, वाशीममध्ये बंडखोरी झाल्याने महायुती व मविआची अडचण झाली. बंडखोरांमुळे राजकीय समीकरण बदलले असून मतदारसंघांमध्ये बहुरंगी सामन्याची शक्यता आहे.
अकोला व वाशीम जिल्ह्यातील आठ मतदारसंघांपैकी बुहतांश ठिकाणी महायुती व मविआला बंडखोरी झाली. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक अपक्षांनी माघार घेतली. मात्र, प्रमुख बंडखोर रिंगणात कायम असल्याने पक्षांच्या अधिकृत उमेदवारांची धडधड वाढली आहे. सर्वाधिक लक्ष अकोला पश्चिम व रिसोड मतदारसंघातील बंडखोरीकडे लागले आहे.
आणखी वाचा-भंडारा : विद्यमानांना नाकारण्याची परंपरा यंदाही कायम राहणार?
अकोला पश्चिममध्ये भाजप नेते तथा माजी नगराध्यक्ष हरीश आलिमचंदानी यांनी अपक्ष म्हणून दंड थोपाटले. उमेदवारी मागे घेण्यासाठी शेवटपर्यंत त्यांच्यावर दबाव आणला तरी त्यांनी माघार घेतली नाही. यशस्वी उद्योजक व सिंधी समाजाचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या बंडखोरीमुळे मोठा धक्का भाजपला बसण्याची दाट शक्यता असून हिंदुत्ववादी परंपरागत मतपेढीत मोठा खड्डा पडू शकतो. शिवसेना ठाकरे गटाचे राजेश मिश्रा यांनी अपक्ष म्हणून कायम असल्याने त्याचा फटका काँग्रेसऐवजी भाजपलाच बसण्याची शक्यता अधिक आहे. वंचितचे अधिकृत उमेदवार डॉ.झिशान हुसेन, माजी महापौर मदन भरगड यांनी माघार घेतल्याने काँग्रेसला दिलासा मिळाला. बाळापूर मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंडखोर कृष्णा अंधारे अपक्ष म्हणून कायम आहेत.
वाशीम जिल्ह्यातील रिसोड मतदारसंघात सर्वात मोठे बंड झाले. गेल्या वेळेस काँग्रेसच्या अमित झनक यांना काट्याची लढत देणारे माजी मंत्री अनंतराव देशमुख अपक्ष म्हणून रिंगणात कायम आहेत. त्यांच्या उमेदवारीचा मोठा फटका शिवसेना शिंदे गटासह काँग्रेसला देखील बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. रिसोडमध्ये आता तिरंगी अटीतटीची लढत होणार आहे. वाशीममध्ये शिवसेना ठाकरे गटाचे निलेश पेंढारकर, राजा पवार, तर भाजपचे नागेश घोपे व शिवसेना शिंदे गटाचे संजु आधारवाडे यांनी बंडखोरी केली आहे. कारंजा मतदारसंघात काँग्रेसच्या व इतर बंडखोरांनी माघार घेतली. ययाती नाईक यांची उमेदवारी कायम असल्याने येथे पंचरंगी लढतीचा अंदाज व्यक्त होत आहे.
आणखी वाचा-वणी, उमरखेडमध्ये महाविकास आघाडीची चिंता वाढली, दोन ठिकाणी चौरंगी तर पाच मतदारसंघात थेट लढत
मतविभाजनाचा धोका
माजी मंत्री अनंतराव देशमुखांच्या बंडखोरीनंतर रिसोड मतदारसंघात तुल्यबळ तिरंगी लढत होईल. अकोला पश्चिममध्ये देखील बहुरंगी लढत रंगेल. इतर मतदारसंघांमध्ये मविभाजनाचा मोठा धोका महायुती व मविआपुढे राहणार आहे.