पुणे : पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघांत महायुतीचा एकही ब्राह्मण उमेदवार नसला, तरी शहरात मोठी लोकसंख्या असलेल्या या समाजाची मते महायुतीकडे वळावीत, यासाठी विशेषत: भारतीय जनता पक्षाने ‘सूक्ष्म’ नियोजन केले आहे. ब्राह्मण समाज महायुतीलाच मतदान करील, असा आत्मविश्वास बाळगूनसुद्धा भाजपला दोन वर्षांपूर्वी ‘कसब्या’सारख्या बालेकिल्ल्यात पोटनिवडणुकीत पराभूत व्हावे लागले होते. या वेळी असा दगाफटका न होण्यासाठी पक्षाने कंबर कसली आहे. त्यासाठी ‘स्नेह’मेळाव्यांपासून सोसायटी वा परिसरनिहाय छोट्या बैठका आयोजिल्या जात आहेत.
बहुतांश ब्राह्मण समाज पारंपरिकरीत्या भाजपबरोबर राहिला आहे. मात्र, भाजपने ब्राह्मण उमेदवार न दिल्याचा फटका बसल्याने कसबा मतदारसंघात पोटनिवडणुकीत पराभव झाला, अशी उघड चर्चा दोन वर्षांपूर्वी झाली. वास्तविक यापेक्षाही इतर काही महत्त्वाची कारणे या पराभवाला होती. मात्र, त्यातील एक कारण ब्राह्मण मतदारांची नाराजी, हे होतेच, हे पक्षातील धुरीणही खासगीत बोलून दाखवत होते. ब्राह्मण मतदारांनी पूर्ण विरोधात मतदान केले नाही, तरी मतदानाला बाहेरच न पडणे किंवा ‘नोटा’ला मते देणे यातून राग व्यक्त केल्याचे सांगितले जाते. या वेळी असे घडू नये, याची ‘काळजी’ घेण्याची जबाबदारीच पक्षाने काही जणांकडे सोपविली असून, जास्तीत जास्त मतदान कसे होईल, याची जबाबदारीच काही जणांवर सोपविली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या काहीच दिवस आधी महाराष्ट्रातील ब्राह्मण संघटनांची शिखर संघटना असलेल्या सकल ब्राह्मण समाज या संघटनेने महायुतीला पाठिंबा जाहीर केला. ‘महायुतीने परशुराम आर्थिक विकास महामंडळ आणि अमृत महामंडळ स्थापन केले, तसेच आठ ब्राह्मण उमेदवारांना उमेदवारीही दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर, आम्ही महायुतीला पाठिंबा दिला आहे,’ असे या संघटनेचे मुख्य समन्वयक भालचंद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
सकल ब्राह्मण समाजाने आठही मतदारसंघांतील ब्राह्मणबहुल भागांत जाऊन तेथे छोट्या बैठकांपासून गाण्यांचे कार्यक्रम आयोजित करून महायुतीला मतदान करण्याचा संदेश पोहोचविण्यास सुरुवात केली आहे. ‘पुण्यात ३५ ब्राह्मण संघटना सध्या महायुतीच्या कामात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी आहेत. ‘स्नेह’मेळाव्यांतून महायुतीला मतदान करण्याचा संदेश पोहोचविण्याबरोबरच बूथनिहाय माहिती गोळा करून ब्राह्मण मतदारांशी ‘संवाद’ साधण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आहे. शेवटच्या आठवड्यात त्याला आणखी वेग येईल,’ असे सूत्रांनी नमूद केले.
आणखी वाचा-आमगाव-देवरीत संजय पुराम विरुद्ध राजकुमार पुराम सामना; माजी आमदारापुढे माजी सनदी अधिकाऱ्याचे आव्हान
कसबा, कोथरूडवर लक्ष
कसबा आणि कोथरूड या दोन मतदारसंघांत ब्राह्मण मतदारांची संख्या मोठी असून, तेथे ही मते निर्णायक ठरतील, असा महायुतीचा अंदाज आहे. त्यानुसार, या मतदारांना मतदानासाठी बाहेर काढणे यासाठीची मोहीम आतापासूनच राबविली जात आहे. याशिवाय खडकवासला, शिवाजीनगर आणि हडपसर या मतदारसंघांतील काही भागांत हीच रणनीती अवलंबून त्यानुसार ब्राह्मण मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सुनील देवधरांची अनुपस्थिती
लोकसभा निवडणुकीच्या वेळी पुण्यातून इच्छुक असलेले सुनील देवधर गेले सहा महिने पुण्यात सक्रिय होते. मात्र, सध्या त्यांच्यावर पक्षाने मुंबईतील काही मतदारसंघांची जबाबदारी सोपवलेली असली, तरी ब्राह्मण मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांनाही काही छोट्या सभा, मेळावे, बूथनियोजनासाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. याबाबत देवधर यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले, ‘सध्या तरी पक्षाने बृहन्मुंबई भागात दिलेली जबाबदारी मी पार पाडत आहे. पक्षाने आणखी कुठली जबाबदारी दिली, तर तीही पार पाडीन.’
भाजप हा सर्वच जातींना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळे त्या दृष्टीने पुण्यातही सर्व मतदारसंघांत नियोजन सुरू आहे. -संदीप खर्डेकर, प्रदेश प्रवक्ते, भाजप