साताराः साताऱ्यातील राजकारण हे पक्षांपेक्षा खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे हे दोन राजे आणि लोकप्रतिनिधींभोवती फिरत असते. यंदा लोकसभेपासूनच केवळ पक्षच नाही तर दोन्ही राजेही तना-मनाने एकत्र राहिल्याने कार्यकर्ते आणि मतदारांपर्यंत या एकीचा संदेश गेला आहे. या दोन शक्ती एकत्र आल्याने शेवटच्या टप्प्यात साताऱ्याऱ्यांची निवडणूक एकतर्फी होण्याची चिन्हे दिसत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साताऱ्यात दोन राजे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकल्याने कायम मोठा तणाव निर्माण व्हायचा. शिवेंद्रसिंहराजे यांच्या घरासमोर २०१४ च्या कोजागरी पौर्णिमेच्या रात्री कार्यकर्त्यांचा झालेला मोठा गोंधळ, आणेवाडी टोलनाका प्रकरण, जावळीतील जिल्हा परिषद निवडणुकीतील दगडफेक, त्याचबरोबर साताऱ्यातील राजकीय कलगीतुरा आणि दोघांच्या समर्थकांमधील रोषाचे वातावरण अशा अनेक घटनांमधून साताऱ्यातील जनतेने खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील संघर्ष पाहिला आहे. त्यामुळे दोन्ही ‘राजे’ जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा त्याकडे सर्वांचेच लक्ष असायचे. एकदा तर उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजेंशिवाय दुसरा आमदार यंदा दिल्याशिवाय राहणार नाही, असेही रागापोटी विधान केले होते. दोघेही राजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होते तेव्हाही दोघांमध्ये तीव्र संघर्ष होता. शरद पवारांनी अनेकदा दोघांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला होता. तरीही दोघांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत असत. वाद काही मिटत नव्हते. या वादातून साताऱ्यातील राजकारणात दोघांचेही कार्यकर्ते, समर्थक तयार झालेले होते. आपल्या सोईसाठी या दोघांमधील वाद कायम राहतील याकडेच या कार्यकर्त्यांचे लक्ष असायचे.

हेही वाचा >>>चंद्रपूर जिल्ह्यात तुल्यबळ लढती, राजुऱ्यात शेतकरी संघटनेमुळे चुरस

 मात्र, दोघांच्या भाजप प्रवेशानंतर हे दोन्ही गट हळूहळू एकत्र येऊ लागले. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. याची सुरुवात सातारा बाजार समिती इमारतीच्या भूमिपूजन वेळेपासूनच झाली. या वेळीही या दोन गटांत मोठा वाद झाला होता. दोन्ही राजे पुन्हा समोरासमोर आले होते. उदयनराजेंनी हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला होता. या कार्यक्रमाच्या दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री फडणवीस साताऱ्यात होते. त्यांनी या दोघांनाही एकत्र बसवून त्यांच्यातील वाद मिटवले. त्यांची शिष्टाई ति कामी आली. राजकारणाची बदलती दिशा, समान अडथळे, यातून यापुढे एकत्र राहण्यातच बळ असल्याचे ओळखून हे दोन्ही राजे गट तन-मनाने जि एकत्र आले.या समेटानंतर प्रथमच आलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवेंद्रसिंहराजेंनी उदयनराजेंचा मनापासून प्रचार केला. यामुळे साताऱ्याच्या मोठ्या मताधिक्यावर उदयनराजे यांचा विजय सुकर झाला. याचीच जाणीव ठेवत आता उदयनराजेदेखील शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रचारात जोरदारपणे उतरले होते.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 rather than parties politics in satara mp udayanraje and mla shivendrasinhraje are together print politics news amy