बुलढाणा : जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरीला उधाण आले असून सिंदखेड राजा मतदारसंघात तर दोन सत्ताधारी मित्रपक्ष एकमेकांसमोर अधिकृतरित्या उभे ठाकले आहेत. यामुळे ‘मैत्रीपूर्ण लढती’ची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. दुसरीकडे, मोठ्या संख्येने मैदानात उतरणारे अपक्ष यंदाच्या विधानसभा रणसंग्रामाचे एक वैशिष्ट्य ठरले आहे. त्यांच्यामुळे होणाऱ्या संयुक्त मतविभाजनाचा फटका युती आणि आघाडीला बसण्याची चिन्हे आहे.

सिंदखेड राजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज कायंदे यांना, तर शिवसेना शिंदे गटाने माजी आमदार शशिकांत खेडेकर यांना ‘एबी फॉर्म’सह मैदानात उतरविले आहे. दुसरीकडे, भाजप विधानसभा प्रमुख सुरज हनुमंते, अंकुर देशपांडे, सुनील कायंदे या भाजप नेत्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल करून गुंतागुंत वाढविली आहे. महायुतीतील मित्रपक्ष पिरिपाचे भाई विजय गवई यांनीही रिंगणात उडी घेतली आहे. यातील काही बंडखोर अर्ज मागे घेतील, पण युतीचा अधिकृत उमेदवार कोण? हा प्रश्नच आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Assembly Election 2024 : गोंदिया जिल्ह्यात ‘बंडोबां’मुळे महाविकास आघाडीचे समीकरण बिघडणार?

भाजप-सेनेचा अजब तिढा

बुलढाणा विधानसभा मतदारसंघात भाजपचे लोकसभा संपर्कप्रमुख माजी आमदार विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून भाजप पक्षाकडे मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी मागितली आहे. तसे झाल्यास शिंदे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवतील. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार आमदार संजय गायकवाड यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते. दुसरीकडे, आमदार गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी चिखली मतदारसंघात अपक्ष उमेदवारी दाखल करून भाजप उमेदवार श्वेता महाले यांच्या अडचणी वाढवण्याचा प्रयत्न चालवला आहे. यामागे थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर दबाव वाढविणे, हा त्यांचा एकमेव हेतू असल्याचे बोलले जाते. याशिवाय, भाजप कार्यकर्ते विजय पवार, महायुतीतील रिपाइं आठवले गटाचे नरहरी गवई यांनीही अर्ज दाखल केले आहेत. महालेंसाठी हे अडचणीचे ठरू शकते.  

हेही वाचा >>> राजू शेट्टी यांच्या राजकारणाला ओहोटी    

बुलढाणा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या महिला नेत्या प्रेमलता सोनोने यांनी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खामगाव मतदारसंघात बजरंग दलाचे नेते अमोल अंधारे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून भाजप उमेदवार आकाश फुंडकर यांना आव्हान दिले आहे .              

आघाडीतही बंडाळी

शिवसेना उबाठाचे प्रा. सदानंद माळी यांनी बुलढाणा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मेहकर मतदारसंघात शिवसेना उबाठाचे डॉ. गोपाल बच्छिरे यांनी व काँग्रेसचे लक्ष्मणराव घुमरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यांचे बंड वा नाराजी महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ खरात यांना अडचणीचे टरू शकते. मलकापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे हरीश रावळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.