अमरावती :  बंड शमविण्‍यासाठी वरिष्‍ठ नेत्‍यांनी ‘समजूत मोहीम’ हाती घेतली असली, तरी जिल्‍ह्यात अद्याप उमेदवारी मागे घेण्‍याचा शब्‍द कोणत्‍याही बंडखोर उमेदवाराने दिलेला नाही. अमरावती, बडनेरा, मेळघाट, अचलपूर, मोर्शी या ठिकाणी महायुतीतील बंडखोरी अटळ मानली जात आहे. सोमवारी दुपारपर्यंत बंडखोर उमेदवारांच्‍या माघारीचे चित्र स्‍पष्‍ट होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक बंडखोर उमेदवारांकडे राजकीय पक्षांच्‍या बड्या नेत्‍यांनी समझोता करण्‍यासाठी काही दूत पाठविले होते, पण हे प्रयत्‍न देखील अपुरे पडत असल्‍याचे चित्र आहे.

राज्‍यात भाजपमधील बंडखोरांची समजूत काढण्‍याची जबाबदारी रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, रवींद्र चव्‍हाण, श्रीकांत भारतीय यांच्‍यावर सोपविण्‍यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पण, बडनेरातून श्रीकांत भारतीय यांचे बंधू तुषार भारतीय हे बंडखोरीवर ठाम आहेत. त्‍यांनी महायुतीचे घटक असलेले रवी राणा यांच्‍या विरोधात गेल्‍या अनेक वर्षांपासून मोहीम उघडलेली आहे, त्‍यांची समजूत काढण्‍यासाठी प्रयत्‍न अखेर थांबविण्‍यात आले आहेत.

मेळघाटमधील भाजपचे बंडखोर माजी आमदार प्रभुदास भिलावेकर यांची समजूत काढण्‍यासाठी आमदार प्रवीण पोटे यांनी दूरध्‍वनीवर संपर्क साधला, पण तेही माघार घेण्‍यास तयार नाहीत. महाविकास आघाडीतील बंडखोर मन्‍ना दारसिंबे यांची समजूत काढण्‍याचे प्रयत्‍न कॉंग्रेस नेत्‍यांकडून सुरू आहेत.

अमरावतीत माजी पालकमंत्री जगदीश गुप्‍ता हे हिंदुत्‍वाचा नारा देत बंडखोरीवर ठाम आहेत.

हेही वाचा >>> बंडखोर नामांकन परत घेण्याची महाविकास आघाडीला अपेक्षा; पुसदमध्ये ययाती नाईक माघार घेणार?

मोर्शीत राजेंद्र आंडे, डॉ. मनोहर आंडे, श्रीधर सोलव यांची समजूत काढण्‍यासाठी भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे हे प्रयत्‍नशील असून कार्यकर्त्‍यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असे या बंडखोर उमेदवारांचे म्‍हणणे आहे. मोर्शीत महाविकास आघाडीतही बंडखोरी उफाळून आली आहे. राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) गिरीश कराळे यांच्‍या विरोधात विक्रम ठाकरे हे बंडावर ठाम आहेत. खासदार अमर काळे यांच्‍या शिष्‍टाईला अद्याप यश आलेले नाही. विक्रम ठाकरे यांचा राग राष्‍ट्रवादीचे नेते हर्षवर्धन देशमुख यांच्‍यावर आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सिंदखेडराजात ‘मित्रांची’ लढत अटळ

दर्यापूरमध्‍ये महायुतीतील युवा स्‍वाभिमान पक्षाचे रमेश बुंदिले माघार घेण्‍याची शक्‍यता नाही. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे अभिजीत अडसूळ यांच्‍यासमोरील अडचणी कायम आहेत.

अचलपूरमध्‍ये भाजपचे बंडखोर नंदकिशोर वासनकर, ठाकूर प्रमोदसिंह गड्रेल, अक्षरा रुपेश लहाने यांच्‍यापैकी कोण माघार घेणार आणि कोण रिंगणात राहणार, हे उद्या दुपारपर्यंत स्‍पष्‍ट होणार आहे.

मोर्शीतील पेच कायम मोर्शीत महायुतीतील राष्‍ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाचे अधिकृत उमेदवार देवेंद्र भुयार आणि भाजपचे उमेदवार उमेश यावलकर हे समोरा-समोर आले आहेत. महायुतीत इतर काही ठिकाणी उद्भवलेल्‍या अशा पेचप्रसंगावर तोडगा काढण्‍यासाठी बैठका सुरू असल्‍या, तरी तोडगा दृष्‍टीपथात आलेला नाही. या मोर्शीत राष्‍ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप यांच्‍यात मैत्रिपूर्ण लढतीची दाट शक्‍यता आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 rebels certain in five constituencies of amravati district print politics news zws