अकोला : अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक लक्षवेधी लढत होत आहे. भाजपचे विजय अग्रवाल, काँग्रेसचे साजिद खान पठाण व वंचित पुरस्कृत अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांच्यात अटीतटीचा सामना आहे. या मतदारसंघात जातीयऐवजी धार्मिक राजकारणाचा ज्वर चढल्याचे चित्र असून मतविभाजन निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला पश्चिम मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. सलग सहा निवडणुकांमध्ये दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांनी विजय मिळवला. त्यांच्या पश्चात भाजपने माजी महापौर विजय अग्रवाल यांना संधी दिली. वर्चस्व कायम राखण्यासाठी आता भाजपने मोर्चेबांधणी केली आहे. ‘अकोला पश्चिम’मध्ये योगी आदित्यनाथ यांची सभा घेऊन भाजपने वातावरण निर्मिती केली. ‘बटेंगे तो कटेंगे’ असा नारे देत हिंदुत्ववादी मतांचे विभाजन टाळण्याचे पक्षाचे पुरेपूर प्रयत्न आहेत. भाजपतील संघटनात्मक यंत्रणेला कामाला लावून मतदान वाढीवर देखील जोर दिला. काँग्रेसकडून साजिद खान पठाण मैदानात आहेत. पक्षाने सलग तिसऱ्यांदा त्यांच्यावर विश्वास दाखवला. गेल्या निवडणुकीत काठावर साजिद खान पठाण यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. गेल्या वेळेसच्या विधानसभेनंतर लोकसभेत देखील मतांचा टक्का वाढल्याने काँग्रेसचे मनोबल वाढले. मुस्लिमांच्या गठ्ठा मतांसह हिंदू मते मिळवण्याचे काँग्रेसचे प्रयत्न आहेत. मतविभाजनाचा धोका लक्षात घेता काँग्रेसने वंचितला रोखण्यासाठी मोठा डाव टाकला होता. साजिद खान यांच्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचार सभांसह प्रतिष्ठित नागरिकांच्या बैठका घेतल्या आहेत.

आणखी वाचा-जळगाव जामोदमध्ये भाजपची घोडदौड थांबणार?

माजी नगराध्यक्ष, अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांना वंचित आघाडीच्या पाठिंब्याचे मोठे बळ मिळाले. वंचितच्या अधिकृत उमेदवाराने शेवटच्या क्षणी माघार घेतल्यामुळे पक्षाची कोंडी झाली होती. वंचितने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली असती तर पक्षाचे सुमारे २५ हजारांचे गठ्ठा मतदान कुणाकडे वळणार, असा प्रश्न असता. वंचित आघाडीने उलट डाव टाकून आपले वजन अपक्ष उमेदवार हरीश आलिमचंदानी यांच्या पारड्यात टाकले. नाराज हिंदुत्ववादी मतांवर देखील आलिमचंदानींचे लक्ष राहील. भाजपचे विजय अग्रवाल, काँग्रेसचे साजिद खान पठाण व अपक्ष हरीश आलिमचंदानी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून अकोला महापालिकेत वेगवेगळ्या प्रभागांचे प्रतिनिधित्व केले. शहरातील प्रश्न व समस्यांची तिघांनाही जाण आहे. अकोला पश्चिममध्ये तिरंगी लढतीची चूरस निर्माण झाल्याचे दिसून येते.

आणखी वाचा-लक्षवेधी लढत : झिरवळ सलग तिसऱ्या विजयाच्या प्रयत्नात

शेवटच्या टप्प्यात मोठा उलटफेर

अकोला पश्चिम मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात मोठा उलटफेर होण्याचा अंदाज आहे. त्या दृष्टीने हालचालींना वेग आला. प्रहारकडून डॉ. अशोक ओळंबे व अपक्ष राजेश मिश्रा देखील निवडणूक लढत असल्याने मतविभाजनाचा अंदाज असून त्यांचे उपद्रव मूल्य किती या दृष्टीने प्रमुख उमेदवार चाचपणी करीत आहेत. शेवटच्या काही दिवसांमध्ये बदल होऊ शकतो.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 religious politics in heats up in akola west assembly constituency bjp vijay agrawal vs congress sajid pathan vs vanchit rebel harish alimchandani print politics