छत्रपती संभाजीनगर : आरक्षण मागणीच्या भूमीत महाविकास आघाडीस हादरा देत भारतीय जनता पक्षाने अग्रेसर राहत मराठाड्यातील ४६ पैकी ४० जागा महायुतीस मिळाल्या. महाविकास आघाडीस केवळ पाच जागांवर समाधान मानावे लागले. भाजपची विजयाची कमान सलग तिसऱ्या निवडणुकीमध्ये चढी राहिली. २०१४ मध्ये भाजपला १५ जागा मिळाल्या होत्या. तेव्हापासून लढवलेल्या २० पैकी १९ जागांवर भाजपचा विजय झाला. आरक्षण आंदोलनात ‘भाजप’ ला पाडा हा नारा आता हवेत विरल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले. लातूर शहरातून अर्चना पाटील चाकूर अटीतटीच्या लढतीमध्ये पराभूत झाल्या अन्यथा सर्व उमेदवार निवडून आले. महिला मतदारांचे शेकडा प्रमाण ७० टक्क्यांहून अधिक असणाऱ्या २० जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मराठवाड्यातील धनंजय मुंडे, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, संजय बनसोडे, अतुल सावे हे सारे मंत्री विजयी झाले. यातील अब्दुल सत्तार, तानाजी सावंत व अतुल सावे या मंत्र्यांची विजयासाठी दमछाक झाली. धनंजय मुंडे यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यापेक्षा तब्बल एक लाख ४० हजार अधिक मतांनी विजय मिळवला. सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनीही मोठ्या फरकाने विजय मिळवला. या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसला. २०२९ मध्ये १० जागांवर असणाऱ्या काँग्रेसचे नेते अमित देशमुख हेही पहिल्या फेऱ्यांमध्ये मागे होते. मात्र, अंतिम निकाल त्यांच्या बाजूने लागला. एमआयएमच्या प्रवासाला पूर्णविराम नांदेडमधून सुरू झालेल्या एमआयएमच्या मराठवाड्यातील प्रवासाला या निवडणुकीमध्ये पूर्णविराम मिळाला. लोकसभेत पराभूत झाल्यानंतर इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून पुन्हा एकदा नशीब आजमावले होते. पहिल्या काही फेऱ्यांमध्ये ७० हजारहून अधिक मतांची आघाडी घेतल्यानंतर ते २१६१ मतांनी पराभूत झाले.