जयेश सामंत, लोकसत्ता
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या कडव्या विरोधानंतरही भाजपने सलग तिसऱ्यांदा संजय केळकर यांना ठाणे शहरातून उमेदवारी दिल्याने महायुतीची मोठी ताकद असूनही या मतदारसंघात यंदाची निवडणूक चुरशीची ठरू लागली आहे. शिवसेना आणि ठाणे हे समीकरण तयार झाले असले तरी ठाकरे गटासाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुतीला ४८,९८५ मतांचे मताधिक्य होते. त्यावेळी मनसेने महायुतीचा प्रचार केला होता. यावेळी मात्र मनसेचे या भागातील नेते अविनाश जाधव आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे यांच्या उमेदवारीमुळे होत असलेल्या तिरंगी लढतीमुळे निवडणूक रंगतदार होत आहे.
ठाणे शहर मतदारसंघ एकेकाळी एकसंध शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात असे. २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे संजय केळकर यांनी शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांना पराभवाची धूळ चारली आणि हा मतदारसंघ हिसकावून घेतला. ठाणे भाजपकडे गेले याची सल आजही ठाकरे आणि शिंदे अशा दोन्ही गटातील शिवसेनेच्या मनात आहे. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ भाजपला सुटला. त्यावेळी संजय केळकर यांच्याविरोधात पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले मनसेचे अविनाश जाधव यांनी ७० हजारांपेक्षा अधिक मते मिळवली. केळकर या निवडणुकीत २० हजार मतांच्या फरकाने विजयी झाले खरे, मात्र जाधव यांना मिळालेल्या मतांचा आकडा पाहून भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. केळकर आणि भाजपवर नाराज राहिलेल्या शिवसैनिकांनीच जाधव यांच्या पदरात मतांचे दान टाकल्याची चर्चाही त्यावेळी भाजपच्या गोटात अगदी उघडपणे सुरू होती. या निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेत ताणलेले संबंध पुढील पाच वर्षे तसेच राहिले. असे असतानाही केळकर यांना सलग तिसऱ्यांदा रिंगणात उतरवून भाजपने एकप्रकार धाडसी निर्णय घेतल्याची चर्चा आता रंगली असली तरी ‘ठाणे आणि केळकर’ असे समीकरण त्यामागे असल्याचेही सांगण्यात येते.
हेही वाचा >>> ठाणे हे खोक्याचे केंद्र – उद्धव ठाकरे
निर्णायक मुद्दे
●ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात वाहतूक कोंडी, जुन्या इमारतींचा पुनर्विकास तसेच झोपडपट्टी पुनर्विकासाचे मुद्दे ऐरणीवर आहेत.
●घोडबंदरच्या दिशेने जाताना दररोज होणारी मोठी कोंडी येथील मतदारांच्या नाराजीचे मुख्य कारण असून या विभागातील पाणीटंचाईचा मुद्दाही मोठा गाजू लागला आहे.
लोकसभेतील राजकीय चित्र
● महायुती – १,२६, ३२१ ● महाविकास आघाडी – ७८, ३३६