दत्तात्रय भरोदे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहापूर : एकसंध शिवसेनेचा एकेकाळचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहापूर विधानसभा मतदारसंघात यंदा शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात थेट लढत पहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एकसंध शिवसेनेची ठाणे जिल्ह्याची कमान असताना त्यांना आव्हान देत पवारांच्या राष्ट्रवादीत गेलेले स्थानिक आमदार दौलत दरोडा हे पुन्हा एकदा रिंगणात असले तरी यावेळी त्यांना ठाकरे आणि शिंदे अशा जुन्या शिवसेनेतील साथीदारांची रसद मिळविताना घाम फूटु लागला आहे.

पाच वर्षांपुर्वी उमेदवारी नाकारल्याने दरोडा राष्ट्रवादीत गेले खरे मात्र त्यांना शिवसैनिकांची सहानभूती होती. यावेळी अशी कोणतीच सहानभूती त्यांना नाहीच शिवाय उद्धव ठाकरे यांच्याशी निष्ठावंत राहीलेल्या शिवसैनिकांचा मोठा गट यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासोबत शरद पवारांची तुतारीचा प्रचार करताना दिसत असल्याने दरोडा यांना हा मतदारसंघ राखणे आव्हानात्मक बनले आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या शहापुर विधानसभा मतदार संघात बंडखोरी करणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या उमेदवाराने ऐनवेळी माघार घेऊन शरद पवार गटाला दिलेला जाहीर पाठिंबा, भाजपला रामराम ठोकत रंजना उघडा यांनी निलेश सांबरे यांच्या जिजाऊ विकास पार्टीत प्रवेश करून मिळविलेली उमेदवारी या नाट्यमय घडामोडींमुळे शहापुर विधानसभेची निवडणूक रंगतदार होणार आहे. वरिष्ठांचे आदेश आले तरी ठाकरे गटातर्फे भरण्यात आलेला उमेदवारी अर्ज मागे घेणार नाही, अशी भूमिका शहापूर तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी सुरुवातीला घेतली होती. आता अर्ज माघारी घेण्याची वाट बंद झाली असली तरी ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवाराने शरद पवार गटाचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांना जाहीर पाठिंबा दिल्याने दौलत दरोडा यांना सुरुवातीला सोपी वाटणारी ही निवडणुक रंगतदार अवस्थेत येऊन ठेपली आहे.

आणखी वाचा-अमरावती : विरोधाभासी राजकारणामुळे मतदारही संभ्रमित !

ठाकरे गटाची बंडखोरी मागे

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर तालुक्यातील मतदारांकडून ‘नको बरोरा नको दरोडा’ असा सूर लावला जात होता. त्यातच ही जागा शिवसेनेला ( ठाकरे गट) सोडण्यात यावी यासाठी उमेदवार उभा करत अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे वरिष्ठांकडे दिले होते. या बंडखोरीचा परिणाम अन्य मतदारसंघात होऊ शकतो हे लक्षात येताच ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार अविनाश शिंगे यांनी निवडणुकीतून माघार घेऊन शरद पवार गटाचे उमेदवार पांडुरंग बरोरा यांना पाठिंबा जाहीर केला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी बरोरा यांच्या प्रचारात सक्रिय सहभागही घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषदेत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढविणाऱ्या रंजना उघडा यांनी भाजपाला रामराम ठोकत जिजाऊ विकास पार्टीत प्रवेश करून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे जिजाऊ विकास पार्टीतील इच्छुक उमेदवारांमध्ये आणि त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे.

आणखी वाचा-महायुती, मविआकडून आश्वासनांचा पाऊस, ‘फुकट’ योजनांच्या घोषणा मतदारांवर प्रभाव टाकणार?

सांबरे फॅक्टरची चर्चा

लोकसभा निवडणुकीत जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांनी शहापूर विधानसभा मतदार संघात प्रथम क्रमांकाची मते मिळविली होती. कुणबी समाजाचे असल्यामुळे त्यांना ही मते मिळाल्याचे समोर आले होते. परंतु शहापूर विधानसभा मतदार संघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. त्यामुळे सांबरे यांना स्वतः या मतदार संघातून निवडणूक लढविणे शक्य झालेले नाही. त्यांनी रंजना उघडा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. उघडा या माजी खासदार कपील पाटील यांच्या समर्थक मानल्या जातात. शहापूरात पाटील यांच्याविषयी असलेली नाराजी लपून राहीलेली नाही. या सगळ्याचा एकत्रित फायदा बरोरा यांना होऊ लागला आहे. मध्यंतरी निलेश सांबरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट चर्चेत आली होती. या मतदारसंघात शिंदेसेनेचा उमेदवार नाही. महायुतीच्या कितीही गप्पा मारल्या जात असल्या तरी शिंदे समर्थकांमध्ये दरोडा यांच्याविषयी फारशी आपुलकी नाही. त्याचाही फटका दरोडा यांना बसताना दिसत आहे.