बुलढाणा : सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात यंदा तिरंगी लढत रंगली आहे. येथे महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे दोन्ही मित्र एकमेकांसमोर उभे ठाकले आहे. शिंदे गटातर्फे माजी आमदार शशिकांत खेडेकर, तर राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे मूळचे काँग्रेसचे मनोज कायंदे मैदानात उतरले आहेत. त्यांच्यातील मैत्रीपूर्ण राजकीय लढत आता राजकीय संघर्षात रूपांतरित झाली आहे. या दोन मित्रांपुढे राजकीय शत्रू अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दिग्गज नेते, माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांचे आव्हान आहे.
१९९५ पासून तब्बल पाचवेळा आमदार राहिलेल्या शिंगणे यांच्यासाठी ही लढत आव्हानात्मक ठरली आहे. प्रचारादरम्यान शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, एकवटलेले पारंपरिक विरोधक, यांच्यासह अजित पवार यांनी शिंगणे यांनाच लक्ष्य केले. पुढील राजकीय भवितव्य ठरविणाऱ्या यंदाच्या लढतीत त्यांच्या समक्ष आव्हानांचा चक्रव्यूह आहे. लोकसंपर्क, मराठा समाजासह मुस्लीम, दलित, माळी, बंजारा आदी समाजाचे आणि काँगेसचे गठ्ठा मतदान, ठाकरे गटाची मते आणि शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या प्रति असलेली सहानुभूती, सहकार क्षेत्राचे पाठबळ, मतदारसंघाचा सूक्ष्म अभ्यास, ही त्यांची ताकद आहे. मात्र, मतदारांपर्यंत घड्याळ ऐवजी तुतारी पोहोचवण्यात त्यांची दमछाक होत आहे.
हेही वाचा >>>२७ मतदारसंघांत मैत्रीपूर्ण लढतींचे ‘मविआ’समोर आव्हान
यंदाच्या निवडणुकीत घड्याळ कायंदे यांच्याकडे आहे. कायंदे यांना ६५ हजारच्या संख्येत असलेल्या वंजारी समाजाचे पाठबळ मिळत आहे. याशिवाय घड्याळाची मते आहेतच. माजी जिल्हापरिषद सदस्य असलेल्या या युवा नेत्याने २०१४ च्या लढतीत चांगली मते घेतली होती. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत पिता देवानंद कायंदे यांचे नुकतेच निधन झाल्याने सहानुभूतीचा तरंगदेखील आहे. इतर ओबीसी समूहांची देखील त्यांना साथ आहे. शिंगणेच्या भूमिकेमुळे दुखावलेला अजित पवार गट ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहिला.
हेही वाचा >>>लक्षवेधी लढत : बहिणीमुळे अवघड वाट, त्यात बंडखोरांचे गतिरोधक
शिंदे गटाचे उमेदवार खेडेकर हे चौथ्यांदा मैदानात उतरले आहेत. व्यापक जनसंपर्क, मतदारसंघाचा गाढा अभ्यास, विकासकामे ही त्यांची ताकद आहे. तेच युतीचे अधिकृत उमेदवार आहेत, हे अप्रत्यक्षपणे पटवून देण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी ठरले. यामुळे भाजपची मते खेडेकर यांच्या पारड्यात जातील, अशी चिन्हे आहेत. याशिवाय वंचित आणि अपक्षांमुळे होणारे मतविभाजन निर्णायक ठरणार आहे.