सोलापूर : महायुती सरकारने आणलेल्या आणि राज्यात प्रचंड लोकप्रिय झालेल्या ‘लाडकी बहीण’ योजनेचा परिणामस्वरूप यंदाच्या निवडणुकीत महिलांचा मतटक्का वाढण्यातही दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्यात विधानसभेच्या अकरापैकी पाच मतदारसंघांमध्ये महिला मतदारांचा टक्का वाढल्याचे दिसून आले. सांगोला, बार्शी, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण आणि पंढरपूर या पाच ठिकाणी मतदानाचा हक्क बजावताना महिला मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
सायंकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार एकूण ३८ लाख ४८ हजार ८६९ मतदारांपैकी २१ लाख ९७ हजार २३६ (५७.०९ टक्के) एवढे मतदान झाले होते. यात पुरुषांचे मतदान अकरा लाख ३० हजार ९०६ तर महिलांचे मतदान तुलनेने ६४ हजार ६४५ इतके कमी म्हणजे १० लाख ६६ हजार २६१ होते. मात्र तरीही पाच मतदारसंघांत महिला मतदारांनी आघाडी घेतली.
हेही वाचा : मराठवाडा : आरक्षण, जरांगे आणि नातीगोती
सांगोल्यात पुरुषांचे मतदान ६२.५० टक्के असताना महिलांच्या मतदानाची टक्केवारी ६६.२३ एवढी दिसून आली. बार्शीत महिलांचे मतदान ६३.५१ टक्के असताना पुरुषांचे मतदान कमी ६१.५१ टक्के होते. अक्कलकोटमध्येही पुरुषांच्या तुलनेत महिलांचे मतदान दोन टक्क्यांनी जास्त होते. सोलापूर दक्षिण आणि पंढरपूरमध्येही महिला मतदारांचा टक्का वाढण्याचे दिसून आले. हे सर्व पाच मतदारसंघ भाजपसह महायुतीच्या वर्चस्वाखाली आहेत. यामध्ये यंदा महिलांचे येथे होत असलेले मतदान हे यापूर्वीच्या तुलनेत लक्षणीय आहे. बहुसंख्य मतदारसंघांमध्ये मतदान केंद्रांवर पुरुषांच्या बरोबरीने महिला मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी सकाळपासूनच मतदानासाठी महिलांचा उत्साह लक्षणीय होता. अनेक महिलांनी एखाद्या सणावाराप्रमाणे नटून-थटून मतदान केंद्रांवर लावलेली हजेरी आणि बजावलेला मतदानाचा हक्क पाहता हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा परिणाम असावा, असा कयास काही जाणकार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.