South Nagpur Assembly Election 2024: कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने सातत्याने उभे न राहता मधून-मधून नवीन चेहऱ्याला पसंती देण्याचा दक्षिण नागपूर मतदारसंघातील मतदारांचा कल काही निवडणुकांपासून दिसून येतो. दक्षिण नागपूरमध्ये मागील चार निवडणुकांपैकी दोनवेळा काँग्रेस आणि दोन वेळा भाजपला यश मिळाले आहे. भाजप व काँग्रेसने या निवडणुकीत जुनेच उमेदवार कायम ठेवले. भाजपचे विद्यमान आमदार मोहन मते व २०१९ मध्ये अत्यल्प मतांनी पराभूत झालेले काँग्रेसचे गिरीश पांडव यांच्यात पुन्हा लढत आहे. ओबीसीबहुल मतदारसंघात दलित आणि मुस्लीम मते निर्णायक स्थितीत आहेत. त्यामुळे दोन्ही पक्षांना येथे समान संधी दिसत असली तरी सत्ताविरोधी भावनेचा फटका भाजपला बसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा : अमरावती जिल्ह्यात ‘डीएमके’ घटक निर्णायक ठरणार?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच या मतदारसंघात मोहन मते यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत फडणवीस यांनी मते यांच्याशी ३० वर्षांपासून असलेल्या मैत्रीचा दाखला दिला. मते यांच्यासाठी त्यांनी पाच वर्षांत केलेल्या कामाच्या जोरावर मते मागण्याऐवजी मैत्रीची आठवण काढण्याची वेळ फडणवीस यांच्यावर यावी याचीच मतदारसंघात चर्चा आहे. फडणवीस यांनी याच सभेत ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यात धनशक्ती कोणाच्या बाजूने? फडणवीस यांचा नेमका रोख कोणाकडे होता. याची चर्चा मतदारसंघात आहे. काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांचे धाकटे बंधू शिवसेनेत (शिंदे) असून ते मुख्यमंत्रीे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जातात. पण, मुख्यमंत्री सरकारचेच प्रमुख आहेत व त्यात भाजपही सहभागी आहे. त्यामुळे ‘धनशक्ती’चा रोख कोणाकडे हा प्रश्न अनुत्तरित आहे. मते यांनी शेकडो कोटींची कामे केल्याचा दावा भाजपकडून केला जातो. अडीअडचणीला धावून जाणारा आमदार अशी मतेंची ओळख आहे. दुसरीकडे गिरीश पांडव २०१९ मध्ये पराभूत झाल्यानंतरही मतदारसंघाच्या सातत्याने संपर्कात आहेत.
हेही वाचा : हिंगणघाटमध्ये बंडखोर उमेदवार निर्णायक ठरणार ?
मतदारसंघातील जातीय समीकरणे
ओबीसीबहुल या मतदारसंघात मुस्लिमांची ८ टक्क्यांहून अधिक मते आहेत. तसेच बौद्ध, दलित मते १९ टक्क्यांहून अधिक आहेत. अनुसूचित जमातीची ५ टक्के मते आहेत. मागील चार निवडणुकीत १७ पेक्षा अधिक उमेदवार रिंगणात असतात. येथून दोन वेळा काँग्रेस आणि दोन वेळा भाजपचा उमेदवार विजयी झाला आहे. गेल्या वेळी वंचित बहुजन आघाडी आणि बसपने प्रत्येकी साडेपाच हजारांहून अधिक मते घेतली होती तर चार अपक्ष उमेदवारांनी प्रत्येकी चार हजारांहून अधिक मते घेतली होती. मतदारसंघ कुणबीबहुल आहे. भाजप व काँग्रेसचे उमेदवार याच समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे ही मते विभाजित होण्याची शक्यता आहे.