नागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी मतदान बुधवारी पार पडले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी चार टक्क्याने तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघात मागच्या निवडणुकीच्या तुलनेत पाच टक्के अधिक मतदान झाले. मतदानाचा हा वाढीव कल कोणाच्या पत्थ्यावर पडणार याची चर्चा सुरू झाली आहे.
संपूर्ण राज्याचे ज्या लढतीकडे लक्ष लागले आहे ती म्हणजे दक्षिण-पश्चिम नागपूरची लढत होय. येथे भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरुद्ध काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव प्रफुल्ल गुडधे यांच्यात लढत झाली. या निवडणुकीत फडणवीस यांनी विकासाचा मुद्दा मांडला तर गुडधे यांचा भर स्थानिक नागरी सुविधांवर होता. ओबीसी बहुल असलेल्या या मतदारसंघातून भाजप सातत्याने विजयी होत असल्याने काँग्रेसने यंदा बहुजन समाजाचा मुद्याही प्रचारात केंद्रस्थानी ठेवला. दोन्ही बाजूंनी करण्यात आलेल्या प्रचाराच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघात झालेली मतदानातील वाढ निर्णायक ठरू शकते.
हेही वाचा >>>मूळ प्रश्न झाकोळले, फक्त काय‘द्या’चं बोला!
२०१९ मध्ये दक्षिण पश्चिम मतदारसंघात ५० टक्के मतदान झाले होते. त्यावेळी फडणवीस ४८ हजार मतांनी विजयी झाले होते. यावेळी ५४ टक्के मतदान झाले. वाढीव चार टक्के मतदान कोणाचे आणि ते कोणाच्या बाजूने जाणार हे पाहणे उत्सूकतेचे ठरणार आहे.दक्षिण पश्चिम हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. पक्षाचे सर्वाधिक भक्कम नेटवर्क याच मतदारसंघात आहे, मतदानाच्या दिवशी खुद्द फडणवीस यांनी अनेक बुथवर जाऊन कार्यकर्त्यांची भेट घेतली. मतदार नोंदणीपासून मतदारांशी संपर्क करण्यापर्यंत पक्षाने राबवलेल्या यंत्रणेचा परिणाम मतदान वाढीत झाल्याचा दावा भारतीय जनता पक्षाचे नेते व कार्यकर्ते करतात. दुसरीकडे वाढीव मतदान हे काँग्रेसच्या संयमी प्रचाराचा परिपाक आहे. अनेक स्वंयसेवी संस्था यावेळी महाविकास आघाडीच्या प्रचारात उतरल्या होत्या. विशेषत: सामाजिक संघटनांचा समावेश यात अधिक होता. त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे मतदान वाढले, असा काँग्रेस नेत्यांचा दावा आहे. महाविकास आघाडीचे ओबीसी कार्ड चालले तर भाजपला येथे जड जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>कथित ध्वनिफितीत कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे आवाज, सुप्रिया सुळे यांनी आरोप फेटाळले; आरोप करणाऱ्यांना नोटीस
बावनकुळेंच्या मतदारसंघातही मतदानात वाढ
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदारसंघात २०१९च्या तुलनेत पाच टक्के वाढ झाली आहे. येथे काँग्रेसचे सुरेश भोयर यांच्याशी बावनकुळे यांची लढत झाली. २०१९ मध्ये या मतदारसंघात ५८ टक्के मतदान झाले होते. यावेळी ही टक्केवारी ५ टक्के वाढली. ६३ टक्के मतदान झाले. २०१९ मध्ये बावनकुळे भाजपचे उमेदवार नव्हते, मात्र काँग्रेसकडून भोयरच रिंगणात होते. भाजपचा १४ हजार मतांनी विजय झाला होता. नागपूर शहरालगत असलेल्या पण कामठी मतदारससंघात समाविष्ट असलेल्या नागरी वस्त्यांनी भाजपला साथ दिल्याने येथे भाजपला मागच्या निवडणुकीत विजय मिळाला होता. यंदाच्या मतदानातील वाढ ही या भागातील आहे की कामठीतील मुस्लिम वस्त्यांमधील आहे. हे निकालाअंती स्पष्ट होईल वत्या अनुषंगाने निकाल लागतील, असे बोलले जात आहे.