बल्लारपूर

रवींद्र जुनारकर, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीत स्वत:च्या बल्लारपूर मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार हे ४८ हजार मतांनी पिछाडीवर पडले होते. यामुळेच विधानसभा निवडणुकीत ही पिछाडी भरून काढण्याचे मोठे आव्हान मुनगंटीवार यांच्यासमोर आहे. दुसरीकडे, काँग्रेसध्ये झालेली दुहेरी बंडखोरी मुनगंटीवार यांच्या पथ्थ्यावर पडू शकते.

भाजपचे ज्येष्ठ नेते व महायुती सरकारमधील वने व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची लढत बल्लारपूर मतदारसंघात काँग्रेसचे संतोष सिंह रावत यांच्याशी आहे. काँग्रेसमध्ये डॉ. अभिलाषा गावतुरे व प्रकाश पाटील मारकवार अशी दुहेरी बंडखोरी झाल्याने महाविकास आघाडीसमोर मतविभाजनाचा धोका आहे.

२००९ पासून येथे सलग तीन वेळा भाजपचे सुधीर मुनगंटीवार विजयी झाले असून ते चौथ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण ३ लाख १२ हजार ३५५ मतदार असलेल्या या मतदारसंघात दलित, कुणबी, तेली व माळी समाजाचे प्राबल्य आहे. तसेच आदिवासी समाजही मोठ्या संख्येने आहे. लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर मतदारसंघात मुनगंटीवार भाजपचे उमेदवार होते. मात्र याच मतदारसंघातून ४८ हजार मतांनी ते पिछाडीवर पडले.

लोकसभेतील राजकीय चित्र

● महायुती – ७३,४५२ 

● महाविकास आघाडी – १,२१,५५२

निर्णायक मुद्दे

● मतदारसंघात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचा बहुतांश भाग या मतदारसंघाला लागून आहे. त्यामुळे वाघ, बिबटे व वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे मानव-वन्यजीव संघर्ष येथे तीव्र आहे. तसेच वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होत असल्याने शेतकरी नाराज आहेत. तसेच रात्रीबेरात्री जंगलातील वन्यप्राणी गावात येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती व दहशतीचे वातावरण आहे.

राजकीय परिस्थिती

दांडगा अनुभव पाठीशी असल्याने भाजपचे सुधीर मुनगंटीवार विकास या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जात आहेत. प्रत्येक गावात विकासाची शिल्लक कामे पूर्ण करण्याचे आश्वासन मतदारांना देत आहेत. काँग्रेसचे संतोष रावत चंद्रपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी जिल्हा बँकेच्या नोकर भरतीचा मुद्दा प्रचारात चर्चेत आणला. मात्र आचारसंहितेमुळे नोकर भरतीला स्थगिती मिळाल्याने त्यांची अडचण झाली आहे. डॉ. अभिलाषा गावतुरे व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, अशी दुहेरी बंडखोरी झाल्याने काँग्रेसचे मतविभाजन अटळ आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 sudhir mungantiwar vs santosh singh rawat ballarpur assembly constituency print politics news zws