पुणे : भाजपकडून प्रसारित करण्यात आलेल्या ‘बिटकॉइन संबंधीच्या कथित ध्वनिफीतीतील आवाज माझा आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा नाही. हे आवाज कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे (एआय) तयार करण्यात आले असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. या प्रकरणी आरोप करणाऱ्यांना कायदेशीर नोटीस बजावली असून कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी पोलीस अधिकारी रवींद्र पाटील यांनी सुळे आणि पटोले यांच्यावर निवडणुकीत परकीय चलन वापरल्याचा आणि निवडणुकीच्या आर्थिक व्यवहारांसाठी बिटकॉइनचा वापर केल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपाचे खासदार, प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी ध्वनिफीत सादर केली. त्यामध्ये सुळे आणि पटोले यांचा आवाज असल्याचा आरोप करण्यात आला. याबाबत खासदार सुळे म्हणाल्या, ‘मी संसदेत बिटकॉइन, क्रिप्टो या विरोधात सातत्याने आवाज उठवला आहे. कथित ध्वनिफितीतील आवाज माझा नाही. तो ‘एआय’द्वारे तयार केलेला आहे. त्रिवेदी यांनी मला बाहेर येवून दाखवावे, असे आव्हान दिले आहे. मी आजही बाहेरच आहे. शिवाय ते सांगतील त्या ठिकाणी येवून मी उघड चर्चा करण्यास तयार आहे.

हेही वाचा :शहरी भागात लोकसभेची पुनरावृत्ती टळली, मतदान केंद्राच्या विकेंद्रीकरणाचा सकारात्मक परिणाम

‘अजित पवार काहीही बोलू शकतात’

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी हा आवाज माझ्या बहिणीचाच असल्याचे म्हटले होते. त्यावर खासदार सुळे म्हणाल्या, ते अजित पवार आहेत. ते काहीही बोलू शकतात. त्यावर मी काय बोलणार.

हेही वाचा :विदर्भात हिंसक घटना, रोकडही जप्त; सायंकाळी ६ पर्यंत सरासरी ५८ टक्के मतदानाची नोंद

गुन्हेगाराच्या म्हणण्याला काय अर्थ?

‘बिटकॉइन’प्रकरणाची सध्या चर्चा असताना, यावर ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले, ‘जी व्यक्ती गुन्हेगार आहे, तुरुंगात होती त्या व्यक्तीच्या म्हणण्याला काय अर्थ आहे? त्यावर बोलण्याची आवश्यकता आहे का?

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 supriya sule denied allegations of bitcoin scam send notice to allegators print politics news css