चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये ही निवडणूक निष्ठाविरुद्ध गद्दारी अशी लढवली जाणार असल्याचे बोलले जात आहे. चिपळूण संगमेश्वर विधानसभेमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विद्यमान आमदार शेखर निकम आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातून प्रशांत यादव यांच्यात निष्ठाविरुद्ध गद्दारी अशी निवडणूक होत आहे. या मतदारसंघातील मतदार निष्ठेच्या बाजूने उभे राहणार असे चित्र उभे राहिले आहे. या मतदारसंघातील विद्यमान आमदार शेखर निकम यांनी केलेली गद्दारी या निवडणुकीत त्यांना भारी पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी, खेड आणि चिपळूण या मतदारसंघात झालेली गद्दारी चर्चेचा विषय आहे. संपूर्ण निवडणूक गद्दारी आणि निष्टावंत यांच्या भोवती फिरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघ हा गेली दोन दशके शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून शेखर निकम हे शिवसेना उमेदवार सदानंद चव्हाण यांना पराभूत करुन ३० हजार मताधिक्यांनी निवडून आले होते. शिवसेनेच्या या बाल्लेकिल्ल्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांकडून शेखर निकम यांनी या मतदारसंघात शिरकाव केला होता. यात त्यांचे वडील गोविंदराव निकम यांचा मोलाचा वाटा होता. गोविंदराव निकम यांचे चिपळूण आणि संपूर्ण जिल्ह्यातील सहकार, शिक्षण आणि राजकीय क्षेत्रातील योगदान आणि त्यांची पुण्याई शेखर निकमांच्या कामी आली होती. निकम यांच्या सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या उभारणीस शरद पवार यांनी लावलेला हातभार आजही येथील मतदार विसरलेला नाही. यांनी गोविंदराव निकम यांना मोलाची साथ दिली होती. कोकणातील शरद पवार यांचे सर्वाधिक विश्वासू म्हणून गोविंदराव निकम आणि त्यानंतर शेखर निकम यांचे नाव घेतले जात होते. मात्र असे कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध असताना अजित पवार यांच्या सोबत शेखर निकम हे शरद पवार यांची साथ सोडून बाहेर पडल्याचे आश्चर्य येथील सर्वच मतदारांना वाटले. मात्र याचा फटका लोकसभेच्या निवडणुकीत शेखर निकम यांना बसलेला दिसून आला. त्यांनी भाजपच्या उमेदवारांचे अत्यंत जोरदारपणे काम केले. मात्र मतदारांनी त्यांना नाकारले. ज्या राजकीय पक्षाच्या झेंड्यावर निष्ठा ठेवत ते निवडून आले होते, त्यावर दाखविलेला अविश्वास मतदारांना सहन झाला नाही.

हेही वाचा – खानापूरमध्ये दोन माजी आमदारपुत्रांमधील लढत चुरशीची

विधानसभेत शेखर निकम यांना पुन्हा मतदारांच्या नाराजीला सामोरे जावे लागणार अशी शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी पक्षावर दाखविलेल्या अविश्वासाची दखल शरद पवार यांनी गांभीर्याने घेतली आहे. त्यांनी शेखर निकम यांच्या तोडीचा उमेदवार प्रशांत यादव यांना या मतदारसंघातून उभे केले आहे. चिपळूणमध्ये प्रशांत यादव यांची उमेदवारी जाहीर करण्यासाठी घेतलेली सभा विरोधकांना धडकी भरविणारी ठरली होती. या मेळाव्याच्या निमित्ताने चिपळूण आणि परिसरात एक दिवस मुक्काम करत शरद पवार यांनी अनेकांच्या भेटीगाठी घेत प्रशांत यादव यांच्यासाठी वातावरणनिर्मिती केली होती. याचा फायदा या निवडणुकीत यादव यांना होणार असल्याचे मतदारांतून बोलले जात आहे.

चिपळूण संगमेश्वरमधील निवडणूक गद्दारी आणि निष्ठा अशी चुरशीची असणार आहे. शेखर निकम यांनी पाच वर्षांच्या कार्यकाळात या मतदारसंघात असा मोठा कोणताच प्रकल्प आणला नाही. फक्त सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांचे शैक्षणिक कार्य कायम सुरू राहिले आहे. मात्र आता त्यांच्या विरोधात असलेले प्रशांत यादव हे राजकारणातील नवा चेहरा म्हणून जरी ओळख असली तरी त्यांनी गेली काही वर्षे यादव कोकण परिसरात खासकरुन चिपळूण परिसरात दुग्ध व्यवसाय वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. वाशिष्ठी दुग्ध प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात मोठे नाव उभे केले आहे. दूध जमविण्यासाठी प्रशांत यादव आज घराघरात पोहचले. याचा फायदा यादव यांना या निवडणुकीत जास्त होण्याची शक्यता आहे. आजला वाशिष्ठी दुग्ध प्रकल्पाची शेकडो कुटुंबे सदस्य आहेत.

हेही वाचा – विरोधकांचे दोन मतदारसंघ भाजपच्या निशाण्यावर; काटोल, सावनेरची लढत प्रतिष्ठेची

प्रशांत यादव यांनी हा उभारलेला कोकणातील पहिला यशस्वी प्रयोग मानला जातो. त्यांचे सासरे सुभाषराव चव्हाण यांची चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था खेड्या-पाड्यातून विस्तारलेल्या प्रचंड शाखा, फार मोठे पसरलेले जाळे आणि आता महाविकास आघाडीची जबरदस्त जनशक्तीची असलेली साथ यादव यांना फायदेशीर ठरणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र या निवडणुकीत गद्दारी की निष्ठा कामी येणार हा निवडणुकीचा निकालच ठरविणार आहे.

सह्याद्री शिक्षण संस्थेच्या माध्यमातून जनसेवेचा घेतलेला वसा आणि माजी खासदार गोविंदराव निकम यांची पुण्याई शेखर निकम यांना तारणार का? हे मतदारांच्या मतदानातूनच ठरणार आहे. शेखर निकम यांनी शरद पवारांबरोबर केलेली गद्दारी या निवडणुकीच्या निकालानंतरच मतदारांना रुचली की नाही हे स्पष्ट होणार आहे.

वाशिष्टी दूध प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवून प्रशांत यादव आज कोकणातील चिपळूण वासियांच्या घराघरात पोहोचले आहेत. त्यांच्या या प्रकल्पामुळे काहींना रोजगार उपलब्ध झाला आहे. प्रशांत यादव आज या भागातील लोकांचे पालनहार म्हणून ओळखले जात आहेत. त्यांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून कोकणातील घराघरात आपल्या नावाचा ठसा उमटविला आहे. याचा फायदा प्रशांत यादव यांना या निवडणुकीत होणार असल्याचे दिसून येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 the battle between chiplun and sangameshwar assembly constituency is one of loyalty vs treachery print politics news ssb