Three Congress Members in Maharashtra Chief Minister Race : विधानसभा निवडणुकीपूर्वीच महाविकास आघाडीत ‘मुख्यमंत्री कोण होणार?’ या चर्चेने जोर पकडला होता. काँग्रेसमध्ये तर निकाल लागण्यापूर्वीच या पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. विशेष म्हणजे विदर्भात काँग्रेसकडून निवडणूक लढवत असलेले महत्वाचे तीन उमेदवार या पदासाठी शर्यतीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विदर्भात काँग्रेसचे अनेक दिग्गज महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. त्यात यवतमाळ जिल्ह्यात दिग्रस मतदारसंघात माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी मतदारसंघात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, गोंदिया जिल्ह्यात साकोली मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उत्तर नागपूरमधून माजी प्रदेशाध्यक्ष नितीन राऊत यांचा प्रामुख्याने समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला विदर्भात मिळालेल्या यशामुळे यावेळी सुद्धा मतदार महाविकास आघाडीला कौल देतील, असा विश्वास आघाडीतील घटक पक्षांना आहे. राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वाधिक जागा लढवत असल्याने निकालानंतर काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष राहिल, असा अंदाज काँग्रेस वर्तुळात व्यक्त होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीही काँग्रेसचाच राहील, असे या पक्षाचे कार्यकर्ते सांगत आहेत. मात्र काँग्रेसमध्ये विदर्भातील तीन महत्वाच्या नावांशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात हेही या पदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. परंतु, बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी सांगली येथे एका सभेत निवडणूक काळात आपल्या मुख्यमंत्रीपदाचा विषय उपस्थित करणे योग्य नाही. पक्षात आपण सर्वात ज्येष्ठ असलो तरी मुख्यमंत्रीपदाबाबत फार महत्वाकांक्षा नाही, असे स्पष्ट केले. मात्र सर्वात ज्येष्ठ आहो, असे सांगून त्यांनी या पदावर आपलीच वर्णी लागावी, असा अप्रत्यक्ष संदेश दिल्याचेही काँग्रेसमधील जाणकार सांगतात.

हेही वाचा : ध्रुवीकरणाशिवाय उत्तर नागपुरात भाजपला यश मिळवणे अशक्य? मतविभाजन काँग्रेसला रोखणार का?

या अनुषंगाने विदर्भात सध्या वेगळ्याच चर्चेने जोर पकडला आहे. दिग्रस मतदारसंघातून माणिकराव ठाकरे विजयी झाले तर जातीय समीकरण, पक्षातील ज्येष्ठता, पक्षनिष्ठा आणि अनुभवाच्या जोरावर ते मुख्यमंत्री पदासाठी मुख्य दावेदार राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापूर्वी प्रदेशाध्यक्ष असताना २०१० मध्ये माणिकराव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाची संधी होती. मात्र त्याच काळात निघालेल्या काँग्रेसच्या झेंडा यात्रेदरम्यान सेवाग्राम येथे काही वक्तव्यावरून ते अडचणीत आले आणि त्यांची मुख्यमंत्री पदाची संधी हुकली व त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री झाले, अशी आठवण जुने काँग्रेस नेते सांगतात. त्यामुळे यावेळी ठाकरे विजयी झाले तर पक्षात मुख्यमंत्रीपदासाठी ते पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार राहतील, अशी चर्चा आहे. या पक्षांतर्गत चर्चेने पक्षातील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतील उमेदवार सध्या अस्वस्थ असल्याची माहिती काँग्रेसच्या गोटातील सूत्रांनी दिली. माणिकराव यांना विदर्भातूनच पक्षांतर्गत आव्हान असल्याची चर्चा जिल्ह्यात आहे. महाविकास आघाडीने दिग्रसची जागा आधी शिवसेना उबाठाला दिली. नंतर ती रद्द करून काँग्रेसकडून ठाकरे यांना उमेदवारी दिली. माणिकराव ठाकरे निवडणूक रिंगणात उतरूच नये, यासाठी पक्षातूनच काही लोकांनी जाणीवपूर्वक अडथळे आणल्याची चर्चा कार्यकर्ते करत आहेत. दिग्रस मतदारसंघात होत असलेली लढत ठाकरे यांच्यासाठी सोपी नाही. माणिकराव ठाकरे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची राजकीय लढाई आहे. ते निवडणूक जिंकल्यास आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास माणिकराव ठाकरे यांच्यासाठी अनेक मार्ग खुले होणार असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 three congress leaders from vidarbha in the race for chief ministership print politics news css