गडचिरोली : विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदानाला केवळ आता ४८ तास शिल्लक असून राज्याचे लक्ष लागलेल्या अहेरी विधानसभेत आत्राम काका-पुतण्यात थेट लढत होणार असे चित्र आहे. याठिकाणी शरद पवार गटाचे उमेदवार आणि काँग्रेसचे बंडखोर उमेदवार हेही शर्यतीत आहेत. त्यामुळे विजयची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबद्दल जिल्ह्यात उत्सुकता आहे.

अहेरी विधानसभेचे विद्यमान आमदार मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम यांनी वडिलांविरोधात केलेल्या बंडामुळे राज्यात या मतदारसंघाची चर्चा आहे. याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून धर्मरावबाबा आत्राम, शरद पवार गटाकडून त्यांची कन्या भाग्यश्री आत्राम, भाजप बंडखोर पुतणे अम्ब्रीशराव आत्राम, काँग्रेस बंडखोर हणमंतू मडावी अशी चौरंगी लढत आहे. मनसेने आणि बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने देखील उमेदवार दिला आहे. माजी आमदार दीपक आत्राम हेही मैदानात आहेत. गेल्या अनेक दशकापासून आत्राम राजघराण्याचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात आजपर्यंत काका-पुतण्या अशी लढत होत होती. यंदा मुलगीही मैदानात उतरल्याने मंत्री आत्राम यांच्यापुढे आव्हान आहे. विशेष म्हणजे याठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून बंडखोरी करण्यात आली आहे. भाजपचे अम्ब्रीशराव आत्राम आणि काँग्रेसचे हणमंतू मडावी हे अपक्ष लढत आहेत. अशी परिस्थितीत दोन्ही आघाडीतील उमेदवारांना मतविभाजनाचा फाटक बसू शकतो. प्रचारादरम्यान उमेदवारांनी एकमेकांवर केलेले आरोप प्रत्यरोप, वादग्रस्त ऑडिओ क्लिप यामुळे चांगलेच वातावरण तापले आहे. एकंदरीत चित्र बघता यंदाही काका मंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि पुतण्या अम्ब्रीशराव आत्राम यांच्यात थेट लढत होण्याची चिन्हे आहेत. सोबत शरद पवार गटाच्या उमेदवार भाग्यश्री आत्राम आणि अपक्ष हणमंतू मडावीही लढत देऊन शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे अहेरीची जागा कोण जिंकणार याकडे स्थानिकांसह राज्याचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा >>>भाजपला आता रामाचा विसर, सुप्रिया सुळे यांचा ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात टोला

बंडखोरांना शेवटपर्यंत अभय 

जागावाटपादरम्यान अहेरीवरून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये खडाजंगी उडाली होती. आघाडीकडून काँग्रेसचा अधिक आग्रह होता. विजय वडेट्टीवार यांनी यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. पण शरद पवारांच्यापुढे त्यांची चालली नाही. त्यामुळे काँग्रेसचे हणमंतू मडावी यांनी बंडाखोरी केली. तर युतीमध्ये भाजपचे अम्ब्रीशराव आत्राम यांनी देखील बंडखोरी केली. मात्र, दोन्ही पक्षांनी या दोघांवर अद्यापपर्यंत कोणतीही करवाई केली नाही. यावरून मडावी आणि आत्राम यांना पक्षांचा छुपा पाठिंबा होता. अशी चर्चा आहे.

Story img Loader