नागपूर: विधानसभा निवडणुकीचा विदर्भातील प्रचार सर्व प्रमुख मुद्द्यांना स्पर्श करणारा ठरला, काही मुद्द्यांवर चर्चा झाली. काहींना प्रतिसादच मिळाला नाही, तर काही मध्येच सोडून देण्यात आले. काँग्रेसने त्यांच्या प्रचाराची सुरुवात नागपूरमधून संविधानाच्या मुद्द्याला स्पर्श करून केली, पण नंतर तो टिकून राहिला नाही, भाजपने योगी आदित्यनाथांना बोलावून ‘कटेंगे तो बटेंगे’चा प्रयोग करून पाहण्याचा प्रयत्न केला, पण तोही लोकांना रुचला नाही. अखेर शेवटच्या टप्प्यात सोयाबीन, कापसाच्या मुद्द्याने जोर पकडला. पण त्याला उशीर झाला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काँग्रेसचा प्रचार मुद्द्यांवर आधारित होता तर भाजपने आक्रमकतेवर अधिक भर दिला. विधानसभेच्या ६२ जागा असलेल्या विदर्भात काही मोजक्या जागांचा अपवाद सोडला तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत आहे. यानिमित्ताने युती -आघाडीतील दोन घटक पक्ष अनुक्रमे भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांतच विदर्भावरील वर्चस्व शाबूत ठेवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. त्यामुळे स्वाभाविकच दोन्ही बाजूंचा सर्वाधिक प्रचाराचा भर विदर्भावर राहिला.

हेही वाचा : मराठवाडा : आरक्षण, जरांगे आणि नातीगोती

राष्ट्रीय, राज्यस्तरीय, विविध राज्यांचे मुख्यमंत्री प्रचारासाठी विदर्भात आले. त्यात प्रामुख्याने पंतप्रधान नरेंद् मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महाविकास आघाडीकडून काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रियंका गांधी, शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या प्रमुख नेत्यांसह अन्य नेत्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांची फक्त भंडारा येथे सभा झाली तर सात जागा लढवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी एकही सभा घेतली नाही.

प्रचारातील महत्त्वाचे मुद्दे

संविधान, जातनिहाय जनगणना, ओबीसीचा मुद्दा, शेतमालाचे प्रश्न, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार या मुद्द्यांसह काश्मीरमधील ३७० कलमाचा मुद्दाही भाजपने प्रचारात आणला. संविधानाचा मुद्दा मांडूनच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विदर्भातील प्रचार नारळ नागपुरात फोडला. भाजपने त्याला प्रचारातून प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र काँग्रेसने हा मुद्दा मध्येच सोडून दिला.

-भाजपने नेहमीप्रमाणे हिंदू- मुस्लीम ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला. विदर्भात बहुसंख्य मुस्लीम असून लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाविकास आघाडीला मतदान केले हे निवडणूक निकालातून स्पष्ट झाले. ते टाळण्यासाठी भाजपने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विदर्भात प्रचाराला बोलवून ‘बटेंगे तो कटेंगे’च्या माध्यमातून ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला. त्याला काँग्रेसच्या वतीने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी ‘जुडेंगे तो जितेंगे’ने नागपूरमध्ये उत्तर दिले.

हेही वाचा : धारावीच्या भोवतीच प्रचार

-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भात अकोला आणि चिमूरमध्ये जाहीर सभा घेतली. नेहमीप्रमाणे त्यांच्या भाषणातून काँग्रेसद्वेष दिसून आला. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात विदर्भातील प्रमुख पीक सोयाबीन आणि कापूस यांच्या पडलेल्या किमतीचा मुद्दा प्रकर्षाने गाजला. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांनी त्यांच्या सभेतून तो आक्रमकपणे माडला. या मुद्द्याची प्रचारातील धग लक्षात घेऊन प्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हमीभाव आणि खरेदी मूल्य यातील फरक शासन देणार असे आश्वासन दिले. त्यानंतर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भातीलच जाहीर सभेत महाराष्ट्रात महायुती सत्तेत आल्यास प्रतिक्विंटल सहा हजाराने सोयाबीन खरेदी करू, असे आश्वासन दिले.

मतदारांचे मुद्दे

विदर्भात सर्वाधिक बेरोजगारी असल्याने हाच प्रमुख मुद्दा मतदारांचा दिसून आला. तरुण मुलांच्या हातांना काम द्या , शेतमालांना योग्य भाव द्या, महागाई नियंत्रणात ठेवा, असे प्रमुख मुद्दे या भागातील मतदारांचे दिसून आले. विरोधी पक्षांकडून ते जाहीर सभेत मांडण्यात आले. सत्ताधाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेतील अनुदानात वाढ करण्याचे आश्वासन देऊन त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न केला. विदर्भातील विशेषत: नागपूरमधील दोन महत्त्वाचे प्रस्तावित प्रकल्प गुजरातमध्ये गेल्याचा मुद्दा या वेळी प्रकर्षाने चर्चेला गेला.

हेही वाचा : कालीचरण महाराजांच्या सभा आयोजनात संबंध नाही, वादग्रस्त वक्तव्यावर संजय शिरसाटांचे स्पष्टीकरण, जरांगे यांचीही भेट

प्रमुख लढती

देवेंद्र फडणवीस (दक्षिण-पश्चिम नागपूर), चंद्रशेखर बावनकुळे ( कामठी), विजय वडेट्टीवार (ब्रम्हपुरी), नाना पटोले (साकोली), धर्मराव बाबा आत्राम ( अहेरी), संजय राठोड (दिग्रस), यशोमती ठाकूर (तिवसा), रवी राणा (बडनेरा) व बच्चू कडू (अचलपूर) एकूण विधानसभा मतदारसंघ – ४६

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra vidhan sabha election 2024 vidarbha campaigning from batenge katenge to soybean print politics news css