नागपूर : विदर्भातील ६२ जागांसाठी झालेल्या मतदानाला काही ठिकाणी हिंसक घटनांचे गालबोट लागले, तर काही ठिकाणी रोकड जप्त करण्यात आली. काही गावांनी नागरी सुविधांच्या मुद्यावर मतदानावर बहिष्कार घातला. विदर्भात सायंकाळी ६ पर्यंत सरासरी ५८ टक्के मतदानाची नोंद झाली. सर्वाधिक कमी मतदान नागपुरात झाले.
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदचे स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. वर्धा मतदारसंघातील मांडवानजिकच्या एका गावात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे यांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा मतदारसंघात भाजप उमेदवार समीर मेघे यांनी त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींकडून बनावट ओळखपत्राद्वारे मतदान करून घेतल्याची तक्रार राष्ट्रवादी (श.प.) या पक्षाने केली. भंडारा जिल्ह्यातील तुमसर मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला.
हेही वाचा :हाणामारीबरोबर मतदान यंत्रे फोडली, मराठवाड्यात ६२ टक्क्यांहून अधिक मतदानाचा अंदाज
मतदानाच्या दिवशी पैशांचा पाऊस
● मध्य नागपुरातील नाईक तलाव, बांगलादेश परिसरात मतदान सुरू असताना काँग्रेस कार्यालयात पैशांच्या पाकिटांसह काही कार्यकर्त्यांना पकडण्यात आल्याचा आरोप भाजपने केला. त्यानंतर पोलिसांनी एकाला ताब्यात घेत पैशांची १० पाकिटे जप्त केली. दरम्यान, या मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांनी भाजपचा आरोप फेटाळला असून उलट भाजप कार्यकर्त्यांनीच खिडकीतून पैशाचे पाकीट आमच्या कार्यालयात टाकल्याचा आरोप केला.
● याशिवाय भंडारा जिल्ह्यातील सिहोरा येथे मतदारांना वाटण्यासाठी आणलेले २.२७ लाख रुपये पोलिसांनी जप्त केले. याप्रकरणी ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना येथे १२ लाखांची रोकड जप्त करण्यात आली. राजुरा विधानसभा मतदारसंघातील गडचांदूर येथे फ्लाईंग सर्वेलन्स टीमने कारवाई करून ६० लाख रुपयांची रक्कम जप्त केली.