मुंबई : ‘‘महाराष्ट्रासाठी आजचा दिवस आणि विजय ऐतिहासिक आहे. आजवर अनेक निवडणुका पाहिल्या, पण अशी निवडणूक यापूर्वी झाली नव्हती. ही निवडणूक जनतेने हातात घेऊन लढविली आणि मतांचा वर्षांव महायुतीवर केला. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी अशा सर्वांनीच आम्हाला मते दिली. इतक्या मोठ्या विजयाबद्दल जनतेला दंडवत घालतो. जनतेसमोर नतमस्तक होत आहोत. महायुतीचे नेते एकत्र बसून, पुढील मुख्यमंत्री कोण होईल, हे ठरवतील,’’ अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.
महायुतीला मिळालेल्या प्रचंड यशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी वर्षा बंगल्यावर संयुक्त पत्रकार परिषद आयोजित केली होती.
हेही वाचा :पवार जिंकले… पवार हरले !
एकनाथ शिंदे म्हणाले की, मागील दोन वर्षांत आम्ही वेगाने विकासकामे केली. लोककल्याणकारी निर्णय घेतले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेली सर्व कामे पुन्हा सुरू करून पूर्ण केली. मुंबईत मेट्रो, कारशेड, अटलशेतू, कोस्टल रोडसारखे प्रकल्प पूर्ण केले. अडीच वर्षांत विकासाला प्राधान्य दिले. राज्याचा सर्वांगीण विकास करीत असताना कल्याणकारी योजना राबविल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, युवा प्रशिक्षण योजना राबविली. आमच्या सरकारने धडाडीने निर्णय घेतले. कोणतीही योजना कागदावर ठेवली नाही, त्यामुळे आपले सरकार म्हणून लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला, असे शिंदे यांनी स्पष्ट केेले. आम्ही विश्वासावर मते मागितली आणि लोकांनी आम्हाला मते दिली. शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार आणि लाडक्या बहिणींना आम्ही वाऱ्यावर सोडले नाही, म्हणूनच महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला प्रचंड बहुमत दिले आहे, असेही शिंदे म्हणाले.
‘खऱ्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब’
लोकसभेला अपप्रचार (फेन नॅरेटिव्ह) करण्यात आला. त्यामुळे आम्हाला फटका बसला. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्री म्हणून सामान्य माणसांसाठी काम करीत राहिलो. घरात बसून, फेसबुकवरून राज्य चालविता येत नाही, हे ही लोकांनी दाखवून दिले आहे. लोकांनी खऱ्या राष्ट्रवादीवर आणि शिवसेनेवर शिक्कामोर्तब केले आहे असे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा :फडणवीसांसाठी ‘पहाटे’ची नामुष्की अन् विजयाचे पर्व…
एकोप्याने राहू, जबाबदारीने कारभार करू : अजित पवार
आजवर कोणत्याही आघाडीला इतक्या मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळाले नाही. बहुमताच्या या प्रचंड आकड्यामुळे आम्ही हुरळून जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नमूद केले. जितका बहुमताचा आकडा मोठा, तितकी आमच्यावरील जबाबदारी मोठी आहे. पुढील पाच वर्षे आम्ही महायुती म्हणून एकोप्याने राहू. केंद्र सरकारच्या मदतीने दिलेली आश्वासने पूर्ण करू. महायुती म्हणून जबाबदारीने कारभार करू, असेही अजित पवार म्हणाले. आमचा ईव्हीएमसह सगळ्यावर विश्वास आहे, पण सकाळच्या नऊच्या भोंग्यावर विश्वास नाही, असा टोला खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता अजित पवार यांनी लगाविला.
जबाबदारी वाढविणारा विजय : देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रातील जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत. प्रचंड मोठ्या विजयामुळे आमच्यावरील जबाबदारी वाढली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर महाराष्ट्रातील जनतेने दाखविलेला हा विश्वास आहे. आता आम्हाला खूप काम करावे लागेल, याची जाणीव आहे. आम्ही महाराष्ट्रातील मतदारांनी जो विश्वास दाखविला आहे, त्याला तडा जाऊ देणार नाही.